राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवनावर

महाराष्ट्रात पुढील २४ तास अतिमहत्त्वाचे; पुण्यासह उत्तर महाराष्ट्राला रेड अलर्ट, विदर्भात पावसाचा कहर कायम

Maharashtra Rain Alert

कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव कायम; पुणे, नाशिक, धुळे, जळगावमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, नदी-नाल्यांना पूर आल्याने प्रशासन सतर्क

मुंबई : राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला असून, विशेषतः विदर्भात परिस्थिती गंभीर बनली आहे. अनेक नद्यांना आणि नाल्यांना पूर आल्याने काही गावांचा संपर्क तुटला असून नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. अशा पार्श्वभूमीवर हवामान विभागाने पुढील २४ तास महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचा इशारा दिला आहे.

पुणे हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र परिसरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकल्यामुळे राज्यातील अनेक भागांत जोरदार पावसाची स्थिती कायम आहे. पुढील २४ तास पुणे तसेच उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र त्यानंतर पावसाची तीव्रता कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पावसाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील घाटमाथा भागासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, पुणे शहरासाठी ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे आणि जळगाव या जिल्ह्यांनाही पुढील २४ तासांसाठी रेड अलर्ट देण्यात आला असल्याची माहिती पुणे वेधशाळेने दिली आहे.

यंदा मान्सूनचे आगमन उशिरा झाले असले तरी पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार राज्यातील अनेक धरणांमध्ये समाधानकारक पाणी साठा झाला असून ही बाब दिलासादायक मानली जात आहे.

दरम्यान, नाशिक जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा जोर कायम असून अनेक नदी-नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.

नागपूरमध्येही मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याची परिस्थिती निर्माण झाली असून प्रशासनाने आवश्यक उपाययोजना सुरू ठेवल्या आहेत.