Scheduled Caste reservation: अनुसूचित जातीचे उपवर्

लातूरमध्ये उद्या घुमणार आंबेडकरी आवाज!

Scheduled Caste reservation

उपवर्गीकरणा विरोधात महामोर्चा; ५८ जाती समूहांचा राहणार सहभाग

लातूर (Scheduled Caste reservation) : अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये अ, ब, क, ड अशा स्वरूपाचे उपवर्गीकरण करण्याच्या प्रक्रियेला विरोध करण्यासाठी आज लातूरमध्ये आंबेडकरी जनतेचा आवाज घुमणार आहे. अनु. जाती प्रवर्गातील ५८ जाती समूहांचा सोमवारी लातूरमध्ये महामोर्चा आयोजित करण्यात आला असून या मोर्चाला रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री राजकुमार बडोले, माजी आमदार बबनराव घोलप, युवा नेते अमन आंबेडकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या मोर्चाला बहुजन समाजातील विविध समाज संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. दरम्यान मोर्चाच्या पार्श्वभूमीवर लातूर शहरातील वाहतूक मार्गात पोलीस प्रशासनाने बदल केला असून सकाळी सहा पासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत हा बदल लागू राहणार आहे. अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये  (Scheduled Caste reservation) अ, ब, क, ड अशा स्वरूपाचे उपवर्गीकरण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या मूळ घटनात्मक उद्देशालाच धक्का बसणार असून समान संधीच्या तत्त्वाला बाधा निर्माण होणार आहे, अशी भूमिका मांडत अनुसूचित जाती प्रवर्ग उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा कृती समितीने महामोर्चाची हाक दिली आहे.  अनुसूचित जाती प्रवर्गातील एकूण ५९ जातींपैकी केवळ एका जातीकडून उपवर्गीकरणाची मागणी करण्यात आली असून उर्वरित ५८ जाती समूहांचा या प्रस्तावाला तीव्र विरोध आहे. त्यामुळे राज्य शासनाने कोणताही एकतर्फी निर्णय न घेता हा प्रस्ताव तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सोमवार, दि. ६ जुलै रोजी सकाळी ठीक ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बौद्धनगर, लातूर येथून भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून हा मोर्चाशाहू चौक, अण्णाभाऊ साठे पुतळा, गंजगोलाई, हनुमान चौक, बसस्थानक परिसर, गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क, अशोका हॉटेल, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जुने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येणार असून मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर होणार आहे. 

शहरात वाहतुकीत तात्पुरते बदल

दि. ०६ जुलै २०२६ रोजी लातूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून सुरू होणारा पायी महामोर्चा राजर्षी शाहू महाराज चौक, अण्णाभाऊ साठे चौक, गंजगोलाई, हनुमान चौक, महात्मा गांधी चौक, मिनी मार्केट, अशोक हॉटेल, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जुने जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर येथे पोहोचणार आहे. यामुळे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी सकाळी ६.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत शहरातील वाहतूक मार्गात बदल केला आहे. वाहनधारकांनी वाहतुकीसंदर्भातील निर्बंध व पर्यायी मार्गांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे. आवश्यक असल्यास प्रवासाचे नियोजन पर्यायी मार्गांचा विचार करून करावे, जेणेकरून वाहतूक कोंडी टाळता येईल आणि कार्यक्रम शांततेत व सुरळीतपणे पार पडेल, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.