मृत घोषित केलेली तरुणी निघाली जिवंत; मग अर्धवट जळालेल्या मृतदेह नेमका कोणाचा?
मुलीच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेले वडील-भाऊ अडचणीतून बाहेर?
बुलढाणा (Buldhana murder case) : जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा धरण परिसरात सापडलेल्या एका महिलेच्या अर्धवट जळालेल्या मृतदेहाच्या प्रकरणात धक्कादायक वळण आले आहे. ज्या तरुणीची हत्या झाल्याचा दावा करत पोलिसांनी तिच्या वडिलांना आणि भावाला अटक केली होती. तीच तरुणी जिवंत असल्याचे समोर आल्याने पोलिसांच्या तपास पद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
सुमारे 20 दिवसांपूर्वी राजुरा धरण परिसरात एका महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह (Buldhana murder case) आणि काही अंतरावर तिचे शिर आढळून आले होते. घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने तपास सुरू केला होता.
डीएनए चाचणी न करताच कारवाई केल्याचा आरोप
तपासादरम्यान पोलिसांनी मृत महिलेची ओळख मध्य प्रदेशातील शिवानी बापूराव कळमेकर अशी पटवून दिली. शिवानीचे तिच्या प्रियकराशी संबंध असल्याने वडील आणि भावाने तिची हत्या करून मृतदेह (Buldhana murder case) महाराष्ट्रात आणून टाकल्याचा दावा पोलिसांनी केला होता. याप्रकरणी शिवानीचे वडील बापूराव कळमेकर आणि तिच्या भावाला अटक करण्यात आली असून दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत.
बुलढाणा पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
मात्र या (Buldhana murder case) प्रकरणाला नाट्यमय वळण मिळाले आहे. शिवानी कळमेकर स्वतः जिवंत असल्याचे समोर आले असून ती आपल्या प्रियकरासह बुऱ्हानपूर पोलीस ठाण्यात हजर झाली. यावेळी तिने आपण जिवंत असल्याचे सांगत, आपल्या कथित हत्येच्या गुन्ह्यात वडील आणि भावाला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर शिवानी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात दाखल झाली असून पोलिसांकडून तिचा जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, सापडलेल्या मृतदेहाची (Buldhana murder case) डीएनए चाचणी न करताच पोलिसांनी शिवानीची ओळख निश्चित केली आणि तिच्या वडिलांवर व भावावर गुन्हा दाखल केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणातील पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे, राजुरा धरण परिसरात सापडलेला मृतदेह नेमका कोणाचा होता? याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. या प्रकरणाबाबत पोलीस अधिकृतपणे बोलण्यास टाळाटाळ करत असून पुढील तपास सुरू आहे.