एल-निनोचा घातक विळखा वाढला! महाराष्ट्रातील खरीप पिकांवर संकट गडद
ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पावसाची संभावित मोठी तूट
नवी दिल्ली (El Niño crisis) : देशात जुलैमध्ये अपेक्षेपेक्षा दमदार पाऊस झाल्यानंतर आता ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये मान्सून कमकुवत होण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. पॅसिफिक महासागरातील एल-निनो प्रभावामुळे देशभरात सरासरीच्या ९४ टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ऑगस्टमध्ये सामान्यतः २५४.९ मिलिमीटर पाऊस पडतो; मात्र यंदा हा आकडा कमी राहण्याचा अंदाज आहे. ऑगस्ट-सप्टेंबर या कालावधीत सामान्य ४२२.८ मिलिमीटर पावसाऐवजी सरासरीपेक्षा कमी पर्जन्य होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश, बिहार, दिल्लीसह अनेक भागांमध्ये पावसाची तूट जाणवू शकते. महाराष्ट्रातही विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि पर्जन्यावर अवलंबून असलेल्या भागांतील सोयाबीन, कापूस, तूर, मका आदी खरीप पिकांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. पाणीसाठे, सिंचन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही त्याचे पडसाद उमटू शकतात. मात्र, भौगोलिक परिस्थितीनुसार काही भागांत पावसाचे पुनरागमन होण्याची शक्यता कायम आहे. हवामान विभागाच्या मते, सध्या मध्यम स्वरूपातील (El Niño crisis) एल-निनो सप्टेंबरमध्ये अधिक तीव्र होऊ शकतो. काही जागतिक हवामान प्रतिमानांनुसार त्याचा प्रभाव २०२७ च्या सुरुवातीपर्यंत टिकू शकतो. दुसरीकडे इंडियन ओशन डायपोल सकारात्मक झाल्यास एल-निनोचा परिणाम काही प्रमाणात कमी होऊ शकतो; मात्र विभागाचे प्रतिमान अद्याप त्याला तटस्थ दर्शवत आहेत. दरम्यान, १९०१ नंतरचा जुलै हा दुसरा सर्वाधिक उष्ण महिना ठरला. देशाचे सरासरी किमान तापमान २४.७७ अंश सेल्सिअस (सामान्यपेक्षा ०.६८ अंश अधिक), तर सरासरी तापमान २८.५५ अंश सेल्सिअस (सामान्यपेक्षा ०.६१ अंश अधिक) नोंदले गेले. जुलैमधील नैसर्गिक आपत्तींमध्ये १७५ जणांचा मृत्यू झाला. त्यात वीज कोसळून ८७, पूर व अतिवृष्टीत ८४, तर वादळात ४ जणांचा जीव गेला.
शेती आणि जलसाठ्यांवर काय होईल परिणाम?
ऑगस्ट-सप्टेंबरमधील पावसाची संभाव्य तूट खरीप हंगामासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. या काळात पिकांना सर्वाधिक पाण्याची गरज असते. कमी पावसामुळे विहिरी, नद्या, भूजलपातळी आणि धरणांतील जलसाठ्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. परिणामी, पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होऊ शकतो. काही भागांत समाधानकारक पाऊस अपेक्षित असला, तरी देशातील एकूण पर्जन्यमान घटल्यास ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शेतकऱ्यांच्या अडचणी वाढू शकतात. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष आयएमडीच्या पुढील अंदाजाकडे तसेच सप्टेंबरमधील एल-निनो आणि आयओडी यांच्या प्रभावाकडे लागले आहे.