MLA Sanjay Gaikwad: बुलढाणा विधानसभा मतदारसंघासह ज

बुलढाणाच्या विकासासाठी आ. संजय गायकवाडांचा ‘दिल्लीपर्यंत’ पाठपुरावा..

MLA Sanjay Gaikwad

महामार्ग, रिंग रोड, मिनी विमानतळ अन् नव्या रेल्वेमार्गासाठी गडकरींकडे आग्रही मागणी!

बोथा फॉरेस्ट फ्लायओव्हर, राजूर घाट दुहेरीकरणासह महत्त्वाकांक्षी प्रकल्पांवर सविस्तर चर्चा

बुलढाणा (MLA Sanjay Gaikwad) : बुलढाणा विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आ. संजय गायकवाड यांनी विकासाचा मुद्दा थेट केंद्रीय स्तरावर नेला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथील निवासस्थानी भेट घेत बुलढाणा–मलकापूर–चिखली महामार्ग, रिंग रोड, मिनी विमानतळ, नवीन रेल्वेमार्ग, बोथा फॉरेस्ट फ्लायओव्हर आणि राजूर घाट दुहेरीकरणासह विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी त्यांनी आग्रही पाठपुरावा केला.

आ. गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी रविवारी १२जुलै रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाशी निगडित विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांसह मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विविध विकासकामांना मंजुरी, आवश्यक निधी आणि संबंधित विभागांकडून तातडीने कार्यवाही व्हावी, यासाठी आ. गायकवाड यांनी सविस्तर निवेदनही सादर केले.

‘या’ सहा महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी आग्रह

बुलढाणा–मलकापूर–चिखली महामार्गाची उभारणी, ज्ञानगंगा अभयारण्यातील बोथा फॉरेस्ट परिसरात वन्यजीवांच्या सुरक्षित हालचालींसह वाहतूक सुलभ करण्यासाठी फ्लायओव्हर, बुलढाणा शहराची वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता रिंग रोड, प्रस्तावित मिनी विमानतळाला मंजुरी, बुलढाणा–बऱ्हाणपूर–मलकापूर नवीन रेल्वेमार्ग तसेच राजूर घाटाचे दुहेरीकरण या सहा महत्त्वपूर्ण प्रकल्पांची गरज आ. गायकवाड यांनी गडकरी यांच्यासमोर ठामपणे मांडली. या प्रकल्पांना केंद्र शासनाची मंजुरी मिळवून आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणीही (MLA Sanjay Gaikwad) त्यांनी केली.

मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नही मांडले..

बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील रस्ते, दळणवळण, वाहतूक व्यवस्था आणि पायाभूत सुविधांशी संबंधित विविध प्रलंबित विषयांकडेही आ. गायकवाड यांनी केंद्रीय मंत्र्यांचे लक्ष वेधले. नागरिकांच्या हिताच्या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढून संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्याची विनंती त्यांनी केली.

गडकरींकडून सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आ. संजय गायकवाड यांनी मांडलेल्या मागण्या आणि प्रस्तावित विकास प्रकल्पांची माहिती लक्षपूर्वक ऐकून घेतली. संबंधित विभागांमार्फत सर्व प्रस्तावांचा सकारात्मक विचार करून नियमानुसार आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिल्याचे सांगण्यात आले. यावेळी नगरपालिका पाणीपुरवठा सभापती नयनप्रकाश शर्मा, नगरसेवक बबलू मावतवाल, नगरसेवक युनुस कुरेशी, कार्यकारी अभियंता काळे तसेच स्वीय सहाय्यक रोहित गवळी उपस्थित होते.

बुलढाण्याच्या विकासाला मिळणार ‘गती’

महामार्ग, रिंग रोड, नवीन रेल्वेमार्ग, मिनी विमानतळ आणि अन्य पायाभूत सुविधा प्रकल्प प्रत्यक्षात साकार झाल्यास बुलढाणा जिल्ह्याच्या आर्थिक, औद्योगिक, कृषी आणि पर्यटन विकासाला मोठी चालना मिळणार आहे. नागरिकांच्या दळणवळण सुविधांमध्येही आमूलाग्र सुधारणा होणार आहे. त्यामुळे आ. धर्मवीर संजय गायकवाड यांनी केंद्रीय स्तरावर केलेला हा पाठपुरावा बुलढाण्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जात आहे.