आषाढी एकादशीसाठी मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांची सुविधा
नागपूर–मिरज, अमरावती–पंढरपूर, खामगाव–पंढरपूर मार्गावर धावणार विशेष रेल्वे
नागपूर (Ashadhi Ekadashi Special Train) : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या वारकरी व भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर, नवी अमरावती, खामगाव आणि भुसावळ येथून पंढरपूरकडे जाणाऱ्या मार्गांवर या विशेष गाड्या धावणार आहेत. मध्य रेल्वेकडून एकूण चार मार्गांवर विशेष गाड्यांच्या फेऱ्या नियोजित करण्यात आल्या आहेत. यामध्ये नागपूर–मिरज,नवी अमरावती–पंढरपूर , खामगाव–पंढरपूर तसेच भुसावळ–पंढरपूर अनारक्षित विशेष गाडीच्या प्रत्येकी चार फेऱ्यांचा समावेश आहे. नागपूर - मिरज: नागपूर–मिरज (Ashadhi Ekadashi Special Train) विशेष गाडी क्रमांक 01205 नागपूरहून 23 व 24 जुलै रोजी सकाळी 8.50 वाजता सुटणार असून दुसऱ्या दिवशी मिरज येथे सकाळी 11.55 वाजता पोहोचेल. परतीची गाडी क्रमांक 01206 मिरजहून 24 व 25 जुलै रोजी दुपारी 12.55 वाजता सुटेल. या गाडीला अजनी, वर्धा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड, दौंड, कुर्डुवाडी, पंढरपूर आदी स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. अमरावती–पंढरपूर: नवी अमरावती–पंढरपूर (Ashadhi Ekadashi Special Train) विशेष गाडी क्रमांक 01119 नवी अमरावतीहून 21 व 24 जुलै रोजी दुपारी 2.40 वाजता सुटेल. तर 01120 पंढरपूरहून 22 व 25 जुलै रोजी रात्री 7.30 वाजता रवाना होईल. या गाडीला बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड, दौंड आणि कुर्डुवाडी येथे थांबे असतील. खामगाव–पंढरपूर: गाडी क्रमांक 01121 खामगावहून 21 व 23 जुलै रोजी सकाळी 11.30 वाजता सुटेल. तर 01122 पंढरपूरहून 22 व 24 जुलै रोजी सकाळी 5 वाजता सुटणार आहे. ही गाडी जळंब, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, चाळीसगाव, मनमाड, दौंड आणि कुर्डुवाडी मार्गे धावेल. भुसावळ–पंढरपूर: अनारक्षित विशेष गाडी क्रमांक 01159 भुसावळहून 24 व 25 जुलै रोजी दुपारी 1.30 वाजता सुटेल. तर 01160 पंढरपूरहून 25 व 26 जुलै रोजी रात्री 10.30 वाजता रवाना होईल. या गाडीला 16 सामान्य द्वितीय श्रेणी डबे असतील. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना तिकीट बुकिंगसाठी RailOne ॲपचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.