‘370 रुपयांच्या बिर्याणी’ वादानंतर प्रकरण चिघळले; राष्ट्रीय महिला आयोगाची दखल, प्रणित मोरेकडून व्हिडीओद्वारे माफी
(370 Rupee Biryani Case) स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे सध्या त्यांच्या कॉमेडी शोमधील वादग्रस्त प्रसंगांमुळे मोठ्या अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या कार्यक्रमात हिमांशू जांगडा आणि डॉ. सेजल पवार यांनी केलेल्या कथित अश्लील आणि आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे प्रकरण चांगलेच तापले असून संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
या व्हिडिओंमध्ये हिमांशू जांगडा यांनी एका तरुणीसोबतच्या डेटचा अनुभव सांगताना ‘370 रुपये बिर्याणीवर खर्च केले, आता वसूल करावे लागतील’ अशा आशयाचे विधान केले होते. यामधून तरुणीकडून शारीरिक जवळिकीची अपेक्षा सूचित झाल्याचा आरोप होत आहे. तर दुसरीकडे डॉ. सेजल पवार यांनी मृतदेहाशी संबंधित प्रकरणावर प्रायव्हेट पार्ट्सबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
या संपूर्ण प्रकारानंतर प्रणित मोरे यांच्यावरही टीकेचा भडिमार सुरू झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना सोशल मीडियावर तीव्र विरोधाचा सामना करावा लागत असून राष्ट्रीय महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतली आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
वाद वाढत गेल्यानंतर प्रणित मोरे यांनी अखेर सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत माफी मागितली आहे. इन्स्टाग्रामवर जारी केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितले की, संबंधित क्राऊडवर्क व्हिडिओनंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत असून काहींनी त्यांचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. त्या वेळी प्रेक्षकांकडून अपमानास्पद वक्तव्ये होत असताना आपण भावनेच्या भरात योग्य हस्तक्षेप करू शकलो नाही, अशी कबुली त्यांनी दिली.
त्या परिस्थितीत योग्य भूमिका न घेतल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त करत संबंधित सर्व घटकांची माफी मागितली आहे. कायदेशीर कारवाईला पूर्ण सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच भविष्यात स्वतःमध्ये आणि आपल्या कॉन्टेंटमध्ये सुधारणा करून चांगला माणूस म्हणून पुढे येण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, या संपूर्ण वादाची सुरुवात ‘370 रुपयांच्या बिर्याणी’ या विधानावरून झाल्याचे समोर आले आहे. प्रणित मोरे यांच्या शोदरम्यान हिमांशू जांगडा यांनी डेटचा अनुभव सांगताना केलेल्या या विधानानंतर प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. त्यावर कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याबद्दल आणि संबंधित क्लिप सोशल मीडियावर पसरल्यामुळे प्रणित मोरे यांच्यावरही जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यात आली.
या प्रकरणामुळे केवळ संबंधित वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीच नव्हे, तर संपूर्ण शोची संकल्पना आणि त्यातील कंटेंटवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ‘कॉमेडी’च्या नावाखाली अशा प्रकारच्या विधानांना व्यासपीठ मिळू नये, अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून उमटत आहे. वाद अधिक तीव्र झाल्यानंतर अखेर प्रणित मोरे यांनी सार्वजनिकरित्या माफी मागितली असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.