परभणीत कंटेनरच्या चाकाखाली चिरडल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
बोरी बसस्थानक परिसरातील घटना; मयत परभणी शहरातील रहिवाशी
परभणी/बोरी (Parbhani Youth Death) : भरधाव वेगात परभणीहून जिंतूरकडे जाणार्या कंटेनरच्या चाकाखाली चिरडल्याने परभणी शहरातील दुचाकीस्वार माधव शिवाजीराव वल्लेकर वय २२ वर्षे, राहणार धार रोड या तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवार २५ मे रोजी दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी घडली. याबाबत बोरीच्या पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून अधिक तपास चालू आहे. जिंतूर तालुक्यातील बोरी येथे साईबाबा बँकेसमोर सदर घटना घडली. भरधाव वेगात असलेला कंटेनर एमएच ६८ डब्ल्यू १८५०परभणीहून बोरी मार्गे जिंतूरकडे जात होता, या दरम्यान परभणीच्या धार रोडवरील रहिवाशी असलेला माधव शिवाजीराव वल्लेकर हा तरुण त्याच्या मंठा येथील बहिणीला भेटण्याकरिता परभणीहून बोरी मार्गे जिंतूरकडे जात होता. याचवेळी सदर तरुणाचा कंटेनरच्या मागच्या चाकात चिरडल्याने मृत्यू झाला.
अपघातात मृत्यू (Parbhani Youth Death) झालेला तरुण हा परभणीच्या नायरा पेट्रोल पंपावर काम करत असल्याचे त्याच्या मित्रांनी सांगितले. मित्राची मोटार सायकल घेऊन तो बहिणीकडे जात असताना हा अपघात घडल्याचे त्याच्या नातेवाईकांकडून कळले. या घटनेतील कंटेनरचा चालक फरार झाला आहे. मयत माधव चे पार्थिव बोरीच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. अहमद हुसेन पठाण यांनी शवविच्छेदन करणार असल्याचे सांगितले. बोरी पोलीस ठाण्याचे सपोनि रामेश्वर धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव गायकवाड, बीट जमादार शेख वसीम, पोलीस हवालदार सय्यद दिलशान, श्रीराम दंडवते घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
मयताच्या आईचा टाहो या दरम्यान मयत तरुणाची आई मंगलबाई शिवाजीराव वल्लेकर यांनी रुग्णालय परिसरात टाहो फोडला. 'माझ्या मुलाला ठार मारण्यात आले' असे त्या रडत सांगत असल्याने काही काळ वातावरण भावनिक झाले होते. घटनेचा तपास होणे गरजेचे या (Parbhani Youth Death) घटनेत भरधाव वेगातील कंटेनर च्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची योग्य चौकशी करावी, अशी मागणी मयताचे नातेवाईक व नागरिक करत होते.