सावा गावाजवळ रेल्वेतून पडून एकाचा मृत्यू; मृतदेहाची ओळख पटेना
हिंगोली (Sava person Death) : तालुक्यातील सावा गावाजवळ असलेल्या हिंगोली ते वाशिम रेल्वे पटरीवर एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. सदरील व्यक्ती रेल्वेतून खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाल्या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीसात नोंद घेण्यात आली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, हिंगोली ते वाशिम रेल्वे पटरीवर सावा गावानजीक पोल क्रमांक ८६३ जवळील रानमळ्यातील ओढ्याच्या रेल्वे पुलाजवळ रेल्वेतून पडून एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह लिंबाच्या छोट्या झाडाला आडकलेला दिसून आला. याबाबतची माहिती पोलीसांना मिळताच पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, पोलीस उपनिरीक्षक राहुल घुले, राजकुमार जमदाडे, सत्यपाल लोणकर यांनी घटना स्थळी जावून पाहणी केल्यावर मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आला.
मृतदेहाची ओळख पटली नसून कुरळ्या दाढी व मिशा, उजव्या कानात बाळी, गळ्यात हिरव्या व लाल रंगाचा दोरा आणि काळ्या रंगाचा रुमाल, उजव्या हातावर आकाश, अंजली व फिकट रंगात शिल्पा असे गोंदलेले (टॅटू) अंगात काळ्या व पांढऱ्या रंगाचा चौकडी फुल शर्ट, निळसर रंगाची जिन्स पॅन्ट यासोबतच त्याच्या जवळ सिंहाची चिन्ह असलेली धातुची अंगठी, रोख रक्कम, काळा रुमाल, दोरा, पत्करी रंगाची चप्पल आढळून आली. या वर्णणाच्या अनोळखी मृतदेहाबाबत माहिती असल्यास त्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल व त्यांना योग्य ते बक्षीस दिले जाईल अशी माहिती पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांनी दिली आहे.