परभणीत किनी, ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळुचा उपसा
सोनपेठ तालुक्यातील लोहिग्राम गोदापात्रात पोलिसांचा छापा
परभणी (Parbhani Sand Upasa) : सोनपेठ तालुक्यातील लोहिग्राम शिवारात गोदावरी नदीपात्रातून किनी मशीन आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने अवैधरित्या वाळुचा उपसा सुरू होता. मंगळवार २६ मे रोजी सोनपेठ पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकत वाळू उपशाचे साहित्य व इतर वस्तू मिळून २ लाख ११ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गोपनीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीवरुन पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शिरतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. गिते, पोलीस अंमलदार पुंडलिक वंजारे, राजेश कांबळे, भागवत हुंडेकर, अमृत देवकते, शिंदे, महसूल अधिकारी बालाजी नागदे, शाहुराज दिक्षित यांच्या पथकाने कारवाई केली. पोलिसांना पाहून वाळू उपसा करणारे काहीजण पसार झाले. अजय बालाजी आडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्याने पांडुरंग ढाकणे यांच्या सांगण्यावरुन किनीच्या सहाय्याने नदीपात्रातून अवैध वाळू उपसा (Parbhani Sand Upasa) सुरू असल्याची माहिती दिली. या कारवाईत टोपले, खोरे, वायर रोप, वाळू उपशासाठी लागणारे साहित्य, ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. सदर कारवाईत अजय आडे, रामेश्वर राठोड, बन्सीराम राठोड, मुंजा हिक्के, पांडुरंग ढाकणे यांच्यावर सोनपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.