परभणीत अपघातातील जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
पारवा शिवारातील घटना; ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल
परभणी (Parbhani Accidental Death) : शहरातील शाहूनगर पाथरी रोड येथील ६० वर्षीय सुमनबाई प्रल्हादराव खिल्लारे यांचा दुचाकी अपघात झाला होता. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात दुचाकी चालक अमिर खान वजीर खान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पारवा शिवारात २८ मे रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुमनबाई प्रल्हादराव खिल्लारे या अमिर खान वजीर खान याच्या एमएच-२२-बीडी-९४८३ क्रमांकाच्या दुचाकीवर बसून घरी जात होत्या. त्यावेळी रस्त्यावर असलेल्या दगडावरून दुचाकी घसरल्याने सुमनबाई खिल्लारे आणि चालक अमिर खान वजीर खान हे दोघेही जखमी झाले.
अपघातानंतर सुमनबाई खिल्लारे यांच्यावर विष्णुपुरी (नांदेड) येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते. मात्र, ३० मे रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अशोक प्रल्हादराव खिल्लारे यांच्या फिर्यादीवरून शनिवार ४ जूलै रोजी अमिर खान वजीर खान याच्याविरुद्ध ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजगुरू करीत आहेत.