पत्नीची हत्या करून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न
टाकळी जहागीर येथील थरारक घटना
नांदगाव पेठ (Nandgaon Peth murder case) : नजीकच्या टाकळी जहागीर येथे शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी सब्बल घालून निर्घृण हत्या केली. त्यानंतर स्वतः विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. घटनेत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव राजकन्या अर्जुनराव सोनोने (वय ६५) असे असून आरोपी पतीचे नाव अर्जुन सोनोने (वय ७०) असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टाकळी जहागीर येथील हे दाम्पत्य आपल्या कुटुंबासह राहत होते. त्यांचा मुलगा पोलीस सेवेत कार्यरत असून कुटुंब सुखी व समाधानी मानले जात होते. मात्र शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पती-पत्नीमध्ये किरकोळ कौटुंबिक वाद झाला. या वादाचे रूपांतर अचानक हिंसक घटनेत झाले. (Nandgaon Peth murder case) संतापाच्या भरात अर्जुन सोनोने यांनी घरातील लोखंडी सब्बल पत्नी राजकन्या यांच्या डोक्यात घातला. गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घरातून आरडाओरड ऐकू आल्याने शेजारी राहणाऱ्या सुनेने खिडकीतून पाहिले असता धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तिने तातडीने गावकऱ्यांना पाचारण केले. गावकरी घटनास्थळी जमा होताच आरोपीने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सांगितले जाते. गावकऱ्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला असता समोर रक्ताच्या थारोळ्यात राजकन्या यांचा मृतदेह पडलेला होता आणि बाजूला अर्जुन सोनोने हे पडलेले होते. दरम्यान, नागरिकांनी नांदगाव पेठ पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. (Nandgaon Peth murder case) मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला असून अर्जुन सोनोने यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. यामध्ये अर्जुन सोनोने यांची प्रकृती देखील चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे. या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास नांदगाव पेठ पोलीस करीत आहेत.
टाकळी जहागीर येथे घडलेल्या घटनेप्रकरणी प्राथमिक तपासात कौटुंबिक कारणातून पत्नीचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधित आरोपीने विषारी द्रव्य प्राशन केल्याने त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रकरणी नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास करण्यात येत आहे. - दिनेश दहातोंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,पो स्टे. नांदगाव पेठ