Manwat MD Drug seized: परभणीत रत्नापूर शिवारात १४

परभणीतील मानवतमध्ये साडे चौदा लाखाचा एमडी ड्रग्सचा साठा जप्त

Manwat MD Drug seized

रत्नापूर शिवारात स्थागुशा, मानवत पोलिसांची कारवाई  पोलीस अधिक्षक पंकज कुमावत तळ ठोकून

परभणी (Manwat MD Drug seized) : मानवत येथे पोलिसांनी अंमली पदार्थविरोधी कारवाई करत रत्नापूर शिवारातून १४ लाख ६४ हजार ४०० रुपये किंमतीचा प्रतिबंधीत अंमली साठा सोमवार २७ जुलै मध्यरात्री १:४० वाजता जप्त केला आहे. या प्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार २७ जुलै रोजी पहाटे १.४० वाजण्याच्या सुमारास मानवत–पाथरी राष्ट्रीय महामार्गा वरील रत्नापूर शिवारातील मारोती मंदिरासमोर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत अलीम शेख खाजा रा. नायरा पेट्रोल पंपजवळ, पाथरी आणि शाहरुख फिरोजखान पठाण रा. रविवार पेठ, अंबाजोगाई यांना ताब्यात घेण्यात आले. तपासणीदरम्यान आरोपी अलीम शेख याच्याकडून ५२ ग्रॅम ३८ मिलीग्रॅम एमडी अंमली पदार्थ, ज्याची किंमत १० लाख ४७ हजार ६०० रुपये, तर शाहरुख पठाण याच्याकडून २० ग्रॅम ८४ मिलीग्रॅम एमडी, ज्याची किंमत ४ लाख १६ हजार ८०० रुपये असल्याचे आढळून आले. तसेच एमएच-१२-एमई-९३७० क्रमांकाची स्कूटी जप्त करण्यात आली.

या प्रकरणी पोलीस हवालदार सय्यद उमर सय्यद अमीन यांच्या फिर्यादीवरून मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनी श्ािंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खिल्लारे, करीत आहेत. कारवाईनंतर घटनास्थळी पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सरोदे तसेच सहायक पोलीस निरीक्षक दर्शन शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान जिल्हा पोलिस अधिक्षक पंकज कुमावत रात्रभर पोलीस ठाण्यात तळ ठोकून होते.