घरफोडी प्रकरणाचा पर्दाफाश; अनिल ऊर्फ बिट मतकेर उईके जेरबंद
कोरची (Korachi Burglary case) : तालुक्यातील नवरगाव येथे घडलेल्या घरफोडी प्रकरणात कोरची पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणातील फिर्यादी दानसाय नांगसा काटेंगे (रा. नवरगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक २९/०५/२०२६ रोजी ते कुटुंबासह झोपले असताना अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून कपाटातील १५,००० रुपये रोख रक्कम चोरी केली होती. तक्रारीवरून कोरची पोलीस स्टेशन येथे अपराध क्र. ७७/२०२६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांसमोर मोठे आव्हान होते, कारण आरोपी मोबाईलचा वापर करत नव्हता. मात्र, गुप्त माहिती व कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढला. तपासात अनिल ऊर्फ बिट मतकेर उईके (रा. नवरगाव) यानेच घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला अटक करून चोरीस गेलेला मुद्देमालही हस्तगत केला आहे. आरोपीला दिनांक ०३/०६/२०२६ रोजी अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून, सध्या त्याला जिल्हा मध्यवर्ती कारागृह, चंद्रपूर येथे पाठविण्यात आले आहे. ही (Korachi Burglary case) कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कोरची पोलिसांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. पोलिसांचा इशारा: गुन्हेगार कितीही चलाख असला तरी कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाही!