गोरेगावातील झन्ना मन्ना जुगारावर छापा; सहा जणांवर गुन्हा दाखल
छाप्यात फक्त २१५० रुपये जप्त; स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी
हिंगोली (Goregaon gambling raid) : जिल्ह्याची राजधानी म्हणुन ओळखल्या जाणार्या गोरेगावात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने झन्ना मन्ना जुगारावर छापा मारला. परंतु या छाप्यात केवळ २१५० रुपये जप्त करून सहा जुगार्यांवर गुन्हा दाखल केला. जिल्ह्यात अवैध धंदे चालता कामा नये, असे धोरण तत्कालिन पोलिस अधिक्षक डॉ. निलाभ रोहण यांनी राबविले होते. त्यांच्या बदलीनंतर आता हळूहळू अवैध धंद्यावाल्यांनी तोंड वर काढले आहे. २८ जूनला गोरेगाव येथे मधुकर कावरखे यांच्या घरा समोर झन्ना मन्ना जुगार सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळताच त्यांनी दुपारी २.२० वाजता छापा मारला. या छाप्यात फक्त २१५० रुपये पोलिसांच्या हाती लागले.
या (Goregaon gambling raid) प्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात स्थानिक गुन्हे शाखेचे नितीन गोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दत्तराव काशिराम सोळंके, मधुकर आनंदा कावरखे, प्रकाश सुर्यकांत कावरखे, दत्ता किसन बक्काल, नामदेव किसनराव कावरखे, पवन राजाराम मोरे सर्व रा. गोरेगाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या जुगार्यांना ताब्यात घेऊन नोटीसवर सोडले. या प्रकरणाचा पुढील तपास राहूल मैदकर हे करीत आहेत. अवैध धंद्यावाल्यांनी तोंड वर काढल्याने नूतन पोलिस अधिक्षक या अवैध धंद्याचा बिमोड करणार काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.