Parbhani sand action: पाथरी तहसीलदार आणि बीड पोलिस

परभणीत गोदावरी पात्रातील वाळू कारवाईवरून पाथरीचे तहसीलदार अन् बीडचे पोलीस आमनेसामने

Parbhani sand action

तारुगव्हाण येथे पहाटेची घटना चार ट्रॅक्टर बीड पोलिसांनी नेले जेसीबी पाथरी तहसीलच्या ताब्यात

परभणी (Parbhani sand action) : पाथरी तालुक्यातील तारुगव्हाण येथील गोदावरी नदी पात्रात अवैध वाळू उपशावरून बुधवारी  पहाटे पाथरी महसूल प्रशासन आणि बीड जिल्ह्यातील पोलीस पथक यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाल्याची घटना घडली.  पाथरी महसुलच्या हद्दीतून कारवाई केलेली वाहने  बीड पोलिसांनी नेल्याने संबंधीत पोलीसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार  बुधवार २० मे रोजी पहाटे २ ते ४ च्या सुमारास पाथरीचे तहसीलदार भारत गंगावणे हे महसूल पथकासह तारुगव्हाण येथील गोदावरी नदी पात्रात अवैध वाळू उपशाची माहिती मिळाल्याने कारवाईसाठी गेले होते. घटनास्थळी पोहोचल्यावर नदी पात्रात चार ट्रॅक्टर आणि एक जेसीबी मशीन वाळू उपशासाठी उभी असल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे त्या ठिकाणी बीड जिल्ह्यातील परळी ग्रामीण पोलीस पथक आधीपासून उपस्थित होते. यावेळी महसूल प्रशासनाने संबंधित वाहनांबाबत विचारणा केली असता बीड पोलिसांनी त्यांनी आधीच कारवाई केल्याचे सांगितले. मात्र जप्त वाहने उभी करण्यासाठी त्यांच्या हद्दीत जागा नसल्याने ती पाथरी हद्दीत आणून उभी केल्याचे कारण देण्यात आले. यावर  तहसीलदार गंगावणे यांनी तीव्र आक्षेप घेत जर कारवाई केली होती तर पाथरी महसूल प्रशासनाला याबाबत वेळेत माहिती का देण्यात आली नाही? असा सवाल उपस्थित केला. तसेच संबंधित वाहने पुढील कारवाईसाठी नेत असाल तर परळी तहसीलदारांना माहिती देऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करा असेही त्यांनी पोलिसांना सांगितल्याची माहिती आहे. दरम्यान या (Parbhani sand action) मुद्द्यावरून दोन्ही पथकांमध्ये बराच वेळ वाद सुरू राहिला. अखेर बीड पोलिसांनी चारही ट्रॅक्टर पुढील कारवाईसाठी घेऊन गेले. मात्र घटनास्थळी उभे असलेले जेसीबी मशीन तहसीलदारांनी महसूल पथकाच्या मदतीने जप्त करून पाथरी तहसील कार्यालयात आणून लावले. त्यानंतर परत येत असताना बाभळगाव येथे अवैध वाळू वाहतूक करणारा आणखी एक ट्रॅक्टर आढळून आला. त्या ट्रॅक्टरवरही महसूल प्रशासनाने कारवाई केली.

या घटनेनंतर बीड जिल्ह्यात कारवाई करून वाहने पाथरी हद्दीत उभी करण्यामागचे नेमके कारण काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. बीड पोलीसांकडून कारवाई झाल्यानंतरही पहाटेपर्यंत वाहने घटनास्थळीच का होती ? याबाबतही चर्चा सुरू आहे.

दरम्यान उपविभागीय अधिकारी श्रीमती संगीता चव्हाण यांच्या आदेशानुसार या संपूर्ण प्रकाराबाबत परळी तहसीलदारांना पत्राद्वारे माहिती देण्यात येणार असून बीड पोलिसांनी महसूल कारवाईत नेमकी कोणती भूमिका बजावली याबाबत स्पष्टीकरण मागविण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

मी मिळालेल्या माहितीनुसार कारवाई (Parbhani sand action) करण्यासाठी ज्यावेळी घटनास्थळी गेलो होतो त्यावेळी पाथरी महसूल च्या हद्दीमध्येच वाहने उभी होती .मी कारवाई करत असताना घटनास्थळी आधीच उपस्थित असलेल्या बीड पोलिसांनी माझ्यासोबत हुज्जत घातली व घटनास्थळावरून चार ट्रॅक्टर घेऊन गेले .घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून वरिष्ठांना यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. -भारत गंगावणे तहसीलदार पाथरी