बीडमध्ये मुलीला मारहाणीचा जाब विचारणाऱ्या महिलेचा मृत्यू; तीन आरोपींच्या अटकेसाठी नातेवाईकांचा पोलीस ठाण्यात ठिय्या
अंबाजोगाईतील घटनेने खळबळ; एक आरोपी अटकेत, उर्वरित तिघांच्या अटकेची मागणी
बीड: राज्यातील बीड जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये आणखी एका धक्कादायक प्रकरणाची भर पडली आहे. अंबाजोगाई शहरातील चनई वडार वस्ती परिसरात मुलीला झालेल्या मारहाणीबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या ५० वर्षीय महिलेवर वीट फेकून हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, या प्रकरणातील उर्वरित आरोपींना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले.
मृत महिलेचे नाव यशोदा बालाजी राठोड असे आहे. त्यांच्या मुलीला आरोपीकडून मारहाण झाल्यानंतर त्याचा जाब विचारण्यासाठी त्या गेल्या होत्या. त्यावेळी सुभाष लष्करे याने शिवीगाळ करत त्यांच्या डोक्यात वीट फेकून मारली. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेत वाद सोडवण्यासाठी गेलेल्या राणी बालाजी राठोड यांनाही आरोपीच्या मुलांनी काठ्यांनी बेदम मारहाण केली. या प्रकरणी राणी राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून सुभाष लष्करे, मंदाकिनी सुभाष लष्करे, विश्व सुभाष लष्करे आणि इंद्र सुभाष लष्करे या चौघांविरोधात अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून, उर्वरित तीन आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी मृत महिलेच्या नातेवाईकांनी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात काही काळ ठिय्या आंदोलन केले.
दरम्यान, पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वरोती येथे खासगी जमीन मोजणीदरम्यान आणखी एक वादग्रस्त घटना समोर आली आहे. पोलीस बंदोबस्तात सुरू असलेल्या मोजणीला हरकत घेतलेल्या आदिवासींना पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, मुख्य रस्त्यापर्यंत आदिवासींना मारहाण करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. महिलांनाही धक्काबुक्की करण्यात आल्याचे सांगितले जात असून, पोलीस बंदोबस्तात त्यांच्या जमिनीची मोजणी करण्यात येत असल्याचा आरोप आदिवासींनी केला आहे.