अकोला शहरातील शिवणी परिसरात अभिषेक गवईची धारदार शस

अकोला एमआयडीसी परिसरात तरुणाची धारदार शस्त्राने हत्या

अकोला |  अकोला शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या शिवणी परिसरात एका तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून रेल्वेत बसण्यापूर्वीच अटक केली.

 घटनेचा तपशील मृत तरुणाचे नाव अभिषेक रवींद्र गवई (वय २३) असे असून तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, शिवणी येथे राहणारा होता. या प्रकरणातील आरोपी अयोग जीवन सावद (२०) आणि गणेश दयानंद सोनी (२०) हे दोघेही शिवणी परिसरातील रहिवासी आहेत. जुन्या वादातून या दोघांनी अभिषेक गवई याच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला.

 पोलिसांची तातडीची कारवाई घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखा व एमआयडीसी पोलीस स्टेशनची पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आली. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपी रेल्वेने पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे उघड झाले.

 रेल्वे स्थानकावर ‘सिनेस्टाईल’ पाठलाग पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचला. आरोपी पोलिसांना पाहताच पळू लागले आणि चालत्या रेल्वेत बसण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्यांना रेल्वेत बसण्यापूर्वीच जेरबंद केले.

जुन्या वैमनस्यातून खून चौकशीत आरोपींनी जुन्या वादातून खून केल्याची कबुली दिली आहे. पुढील तपासासाठी आरोपींना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

शहरात गुन्हेगारी वाढली अकोला शहरात अल्पावधीतच एकापाठोपाठ तीन हत्याकांड घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसाढवळ्या आणि मध्यरात्री घडणाऱ्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

 “पोलिसांचा वचक संपलाय का?” सलग खूनांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट असून “पोलिसांचा धाक उरलेला नाही का?” असा सवाल उपस्थित होत आहे.

नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना व्यापारी, विद्यार्थी आणि विशेषतः महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुन्हेगारांवर कठोर कारवाई, गस्त वाढवणे आणि विशेष मोहीम राबवण्याची मागणी जोर धरत आहे.

प्रात्यक्षिक करून घेतला गुन्हा आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी नेऊन त्यांच्याकडून गुन्ह्याचे प्रात्यक्षिक करून घेतले.