अकोला येथे पोलिसांनी एका मोठ्या देहविक्री रॅकेटचा

अकोल्यात पोलिसांनी हाय-प्रोफाईल देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश केला

अकोला : खदान पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांनी मोठी कारवाई करत हाय-प्रोफाईल देहविक्री रॅकेटचा भंडाफोड केला आहे. या कारवाईत तंझानिया देशातील एका परदेशी महिलेसह दोन महिलां आणि एका पुरुषाला अटक करण्यात आली असून, परिसरात खळबळ उडाली आहे.


खदान पोलीस स्टेशन हद्दीतील प्रकार

गोरक्षण मार्गालगतच्या एका उच्चभ्रू वस्तीत असलेल्या अपार्टमेंटच्या तळमजल्यावरील सदनिकेत हा अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी नियोजनबद्ध छापा टाकत कारवाई केली. या ठिकाणी उच्चभ्रू ग्राहकांना लक्ष्य करून देहविक्रीचे जाळे चालवले जात असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, या रॅकेटमध्ये परदेशी महिलेचा समावेश असल्यामुळे प्रकरण अधिक गंभीर मानले जात आहे.


एका परदेशी महिलेसह तिघांना अटक

छापेमारीदरम्यान पोलिसांनी तंझानिया देशातील एका महिलेबरोबरच दोन स्थानिक महिला आणि एका पुरुष आरोपीला ताब्यात घेतले. या कारवाईनंतर पोलिसांनी नागरिकांना संशयास्पद हालचालींची माहिती तातडीने देण्याचे आवाहन केले आहे.


परदेशी महिला तंझानियातील; मुंबईत संपर्क

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, तंझानियातील ही महिला मुंबईत एका महिला आरोपीच्या संपर्कात आली होती. त्यानंतर तिला देहविक्रीसाठी अकोला येथे आणण्यात आले असल्याचे प्राथमिक चौकशीतून निष्पन्न झाले आहे.


मोठ्या रॅकेटचा संशय; सखोल तपास सुरू

या प्रकरणी पोलिसांनी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून, आरोपींकडून अधिक माहिती घेतली जात आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोण सहभागी आहेत आणि परदेशी महिलेला भारतात कशा पद्धतीने आणले गेले, याचा सखोल तपास सुरू आहे. या मागे मोठे जाळे कार्यरत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर शेळके, मनोज केदारे व अनैतिक मानवी वाहतूक कक्षाने केली.