Primary Health Centre: आधुनिक जनरल कामगार संघटना ह

​हडोळती येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करा

Primary Health Centre

आधुनिक जनरल कामगार संघटनेची आरोग्य मंत्र्यांकडे मागणी

​अहमदपूर (Primary Health Centre) : अहमदपूर तालुक्यातील हडोळती येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करून आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, या मागणीसाठी 'आधुनिक जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य' च्या वतीने राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री नामदार  प्रकाश आबिटकर यांच्याकडे निवेदनाद्वारे  मागणी करण्यात आली आहे.  हडोळती हे परिसरातील एक मध्यवर्ती आणि अत्यंत महत्त्वाचे गाव असून, गावाची लोकसंख्या सुमारे १८,००० च्या आसपास आहे. या भागातील बाबळदरा, सय्यदपूर, आनंदवाडी, कुमठा, शिवणखेड, वायगाव, वडगाव, कौडगाव, कमलवाडी, येलदरा, हवरगा, डोमगाव, धामणगाव यांसह जवळपास ४० हून अधिक गावांतील हजारो नागरिक आपल्या आरोग्य सेवांसाठी पूर्णपणे हडोळती येथील (Primary Health Centre) प्राथमिक आरोग्य केंद्रावर अवलंबून आहेत. वाढती लोकसंख्या लक्षात घेता सध्याच्या सुविधा अत्यंत अपुऱ्या पडत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. ​सध्याच्या परिस्थितीत हडोळती येथून अहमदपूर येथील (Primary Health Centre) ग्रामीण रुग्णालय २२ किलोमीटर, तर जळकोट येथील ग्रामीण रुग्णालय तब्बल ३० किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे परिसरातील रुग्णांना अपघातातील जखमी, प्रसूती, हृदयविकाराचा झटका, सर्पदंश किंवा- इतर कोणत्याही आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत वेळेवर उपचार मिळणे कठीण होते. अनेकदा वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे रुग्णांचे हाल होतात तर काहींना आपले प्राणही गमवावे लागतात. ही गंभीर बाब लक्षात घेऊन हडोळती येथे २४ तास आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुरू करणे अत्यंत गरजेचे बनले आहे, असे संघटनेने निवेदनात नमूद केले आहे. ​या निवेदनाद्वारे कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अजय कांबळे यांनी प्रशासनाकडे विविध प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करणे, स्त्रीरोग, बालरोग, शल्यचिकित्सक व भूलतज्ज्ञ यांची पदे मंजूर करणे, डिजिटल एक्स-रे, सोनोग्राफी व आधुनिक पॅथॉलॉजी लॅब सुरू करणे, तसेच स्वतंत्र प्रसूती कक्ष आणि नवजात शिशू उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याचा समावेश आहे. यासोबतच रक्तसाठा केंद्र (Blood Storage Unit) सुरू करणे, अतिरिक्त स्टाफ नर्स, फार्मासिस्ट व लॅब टेक्निशियनची नियुक्ती करणे, नवीन सुसज्ज रुग्णालय इमारत व निवासी क्वार्टर्स उभारणे आणि २४ तास उपलब्ध राहील अशी रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. परिसरातील हजारो नागरिकांच्या आरोग्याशी निगडित असलेल्या या अत्यंत महत्त्वाच्या मागणीवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी  विनंती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.