Hingoli Government Hospital: राऊंडवर असताना घाणीने

हिंगोलीतील शासकीय रुग्णालयातील बेवारस रुग्णाला प्रभारी सहाय्यक अधिसेविकेकडून मानवीय मदत

Hingoli Government Hospital

हिंगोली (Hingoli Government Hospital) : माणुसकीला उजाळा देणारी घटना २७ जुलै सोमवार रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात घडली. राऊंडवर असताना घाणीने माखलेल्या एका बेवारस व्यक्तीला पाहून प्रभारी सहाय्यक अधिसेविका आशा क्षीरसागर यांनी तातडीने मदत केली. त्यांच्यासह रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्या व्यक्तीला स्वच्छ करून उपचारासाठी दाखल करण्यात आले.   प्र. सहाय्यक अधिसेविका आशा क्षीरसागर या रुग्णालयात राऊंड घेत असताना शिवभोजन केंद्राजवळ गेल्या असता त्यांना एक व्यक्ती घाणीमध्ये पडलेला दिसला. त्या व्यक्तीने अंगावर विष्टा केली होती आणि अत्यंत दयनीय अवस्थेत होता.

परिस्थिती पाहून क्षीरसागर यांनी वेळ न दवडता त्या व्यक्तीला तात्काळ अपघात विभागात नेले. तेथे त्याला आंघोळ घालण्यात आली आणि परिसर स्वच्छ करण्यास सांगितले.या कामात अपघात विभागातील इंचार्ज सिस्टर विणकरे, स्मार्ट सर्विस सुपरवायजर सिद्धार्थ घोंगडे, जिल्हा रुग्णालयातील प्रभारी मुकादम अरविंद थोरात, अपघात विभागातील कक्ष सेवक सादखान पठाण, अवधूत ढाकरे, सफाईगार सतीश कदम आणि महेश मस्के यांनी मोलाचे सहकार्य केले.

कर्मचाऱ्यांनी त्या व्यक्तीशी संवाद साधून त्याचे नाव विचारले असता त्याने आपले नाव गुलाबराव धोकणे रा. बेलोरा असे सांगितले.सध्या गुलाबराव धोकणे यांच्यावर डॉ. राठोड यांच्या देखरेखीखाली अपघात विभागात पुढील उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना आवश्यक ती सर्व वैद्यकीय मदत दिली जात आहे.

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी बेवारस व्यक्तीला दिलेल्या तातडीच्या मदतीचे आणि संवेदनशीलतेने घेतलेल्या पुढाकाराचे नागरिक आणि रुग्णांच्या नातेवाईकांकडून कौतुक होत आहे.