Fever Outbreak : मुरखळा माल येथील विद्यार्थ्यांना तापाच्या संसर्गाची लागण
८ फेब्रुवारी रोजी दिल्या होत्या फायलेरियाच्या गोळ्या
कुनघाडा रै (Fever Outbreak) : चामोर्शी तालुक्यातील मुरखळा माल येथे तापाच्या संसर्गाची लागण झाली असल्याने अनेक विद्यार्थ्यांना चामोर्शी येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.
मुरखळा माल आरोग्य उपकेंद्र अंतर्गत परिचारिका बोगावार , आशा वर्कर यांच्या माध्यमातून शालेय शिबीर राबवित विद्यार्थ्यांना फायलेरियाच्या गोळ्या वाटप करण्यात आल्या होत्या.
४ दिवसा अगोदर लोकमान्य विद्यालय मुरखळा माल १ येथील कुंजन सुकदेव टिकले (१३) वर्ग ८वा, मुरखळा माल जि.प. शाळेतील तुषार मारोती गाडेमोडे (१४), प्रगती गणेश मंडरे (१२) वर्ग ६ वा, वंश राजेंद्र चुदरी (८)वर्ग २ रा, भूषण दिलीप तुंबडे(१२), प्रदेस रुमाजी सातपुते(१२),मानस रुमाजी सातपुते (१०) या विद्यार्थ्यांना व काही नागरीकांना फायलेरीयाच्या गोळ्या देण्यात आल्या. त्या गोळ्या खाल्ल्यानंतर जवळपास गावातील बहुतांश नागरीक व विद्यार्थ्यांना उलट्या, चक्कर येणे, डोके दुखणे व ताप येत त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांनी दवाखान्यात उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे दाखल केले.
विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. परत गावातील रुग्ण ग्रामीण रुग्णालय येथे भरती होण्यासाठी येत असल्याचे दिसुन येत आहे. तात्काळ चामोर्शी येथील शल्य चिकीत्सक डॉ. प्रवीण किलनाके यांच्याशी संपर्क करून सदर घटनेसंदर्भात विचारणा केली असता , फायलेरियाच्या गोळ्या खाल्ल्यामुळे ताप वगैरे येत नाही असे मत त्यांनी व्यक्त केले.
गावातील प्रतिष्ठित नागरिक काँग्रेसचे मीडिया प्रमुख विजय लाड रुग्णांना भेट देत पालकांना धिर दिला. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून विषबाधा गोळ्यांमुळे झाली की आणखी काही कारण आहे यांचा सखोल तपास करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे.
फायलेरियाच्या गोळ्यांचा परिणाम नाही : डीएचओ शिंदे
विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याच्या संदर्भात जिल्हा परिषदचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिंदे यांना विचारणा केली असता त्यांनी मूरखळा माल येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना १८ फेब्रुवारी व उरलेल्या इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना २६ फेब्रुवारी रोजी फायलेरियाच्या गोळ्यांचे वाटप केल्याचे सांगितले. सोबतच लोकमान्य विद्यालयातील विद्यार्थ्यांना २० तारखेला गोळ्या दिल्या आहेत. फायलेरियाच्या गोळ्याचा काही साईड इफेक्ट असता तर तो एक तास,दोन तास किंवा फारही फार एक दिवसांमध्ये दिसला असता. त्यामुळे गोळ्यांचा कोणताही दुष्परिणाम विद्यार्थ्यांवर झाला नसल्याचे डॉ. शिंदे म्हणाले.विद्यार्थ्यांना तापाच्या संसर्गाची लागण झाली असण्याची शक्यता त्यांनी वर्ताविली. विद्यार्थ्यांना नेमका संसर्ग कशामुळे झाला याची चौकशी सुरू असल्याचेही डॉ.शिंदे यांनी सांगितले.