Nilgai Crop Damage: 'रोही' या वन्य प्राण्यांचा मो

रोहीच्या कळपांचा शेतात धुमाकूळ; सोयाबीनसह खरीप पिकांचे मोठे नुकसान

Nilgai Crop Damage

वनविभागाकडून तक्रारींची दखल घेतली जात नसल्याचा सरपंचांचा आरोप; नुकसानभरपाई व बंदोबस्ताची मागणी

चिखली (Nilgai Crop Damage) : एकीकडे अतिवृष्टी, सततचा पाऊस, रोगराई आणि उत्पादन खर्चात झालेली वाढ यामुळे शेतकरी वर्ग आधीच आर्थिक संकटात सापडला असताना आता वन्य प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांसमोर आणखी एक गंभीर समस्या निर्माण झाली आहे. चिखली तालुक्यातील मुरादपूर, काव्हळा-सावरखेड परिसरासह अनेक गावांच्या शिवारात २० ते २५ च्या कळपाने फिरणाऱ्या 'रोही' या वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला असून या प्राण्यांमुळे सोयाबीन, तूर, उडीद, मूग तसेच इतर खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

शेतकऱ्यांच्या माहितीनुसार, सुमारे २०० ते २६० किलो वजनाचे रोही हे वन्य प्राणी रात्रीच्या वेळी कळपाने शेतामध्ये प्रवेश करतात. हे प्राणी केवळ पिके खात नाहीत, तर शेतभर धावत असल्याने मोठ्या प्रमाणात उभी पिके चिरडली जातात. ज्या ठिकाणी हे प्राणी बसतात किंवा विसावा घेतात, त्या ठिकाणी संपूर्ण पिके नष्ट होऊन मोठमोठे रुखुंदर तयार होतात. त्यामुळे अनेक एकर क्षेत्रातील पिकांचे नुकसान होत असून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सध्या सोयाबीन पीक वाढीच्या महत्त्वाच्या अवस्थेत आहे. अशा काळात होणारे हे नुकसान शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर थेट परिणाम करणारे ठरत आहे. पेरणीपासून आतापर्यंत बियाणे, खते, औषधे, मशागत आणि मजुरीवर मोठा खर्च झाल्यानंतर पीक उभे राहत असतानाच वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांचे कष्ट वाया जात असल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत.

पिकांचे संरक्षण करण्यासाठी अनेक शेतकरी रात्री शेतातच मुक्काम करून जागरण करतात. ढोल, टिनाचे डबे, फटाके, टॉर्च आणि इतर उपायांचा वापर करून हे प्राणी हाकलण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, रोहीचे कळप मोठ्या संख्येने असल्यामुळे त्यांना रोखणे कठीण जात आहे. अनेक वेळा हे प्राणी शेतकऱ्यांच्या अंगावर धावून येत असल्याने जीवितालाही धोका निर्माण झाला आहे. शेतातून हाकलताना हे प्राणी भरधाव वेगाने पळतात आणि त्यांच्या पायाखाली मोठ्या प्रमाणात उभी पिके चिरडली जाऊन नुकसान आणखी वाढते.

याबाबत कव्हळा-सावरखेड गट ग्रामपंचायतीचे सरपंच आकाश सुरूशे यांनी सांगितले की, परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी वन्य प्राण्यांच्या उपद्रवाबाबत वेळोवेळी वनविभागाकडे तक्रारी केल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनही हा प्रश्न संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला आहे. मात्र, वनविभागाकडून तक्रारींची अपेक्षित दखल घेतली जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

सरपंच आकाश सुरूशे यांनी गंभीर आरोप करताना सांगितले की, अनेक शेतकऱ्यांनी पिकांच्या नुकसानीची माहिती देऊनही पंचनामे वेळेत होत नाहीत. परिणामी नुकसानभरपाई मिळत नाही. काही मोजक्याच प्रकरणांची दखल घेतली जाते, तर अनेक तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात असल्याने शेतकऱ्यांचा शासनावरील विश्वास कमी होत आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वन्य प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवाबाबत विशेष ठराव मंजूर करून तो वनविभागाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतरही वनविभागाने योग्य उपाययोजना केल्या नाहीत, शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई दिली नाही, तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल.

शेतकऱ्यांनी शासनाकडे रोहीच्या वाढत्या कळपांचा तातडीने बंदोबस्त करण्याची, नियमित गस्त घालण्याची, पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची तसेच वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याची मागणी केली आहे.

एकीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि दुसरीकडे वन्य प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. त्यामुळे शासन आणि वनविभागाने तातडीने हस्तक्षेप करून या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे.