चिखली तालुक्यात बोगस सोयाबीन बियाण्यांचा सुळसुळाट
युवासेनेच्या आंदोलनानंतर कृषी विभागाची मोठी कारवाई, कंपन्यांना नोटीस व विक्री बंदीचे आदेश!
४८ तक्रारी प्राप्त; अंकुर आणि महाबीज कंपनीच्या बियाण्यांबाबत सर्वाधिक तक्रारी दोषी कंपन्यांवर गुन्हे दाखल होणार; युवासेना जिल्हाप्रमुख नंदू करहाडे यांच्या पाठपुराव्याला यश
चिखली () : चालू खरीप हंगाम २०२६ मध्ये चिखली तालुक्यात निकृष्ट, बोगस व संशयास्पद सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे मोठे संकट ओढवले आहे. बियाणे पेरल्यानंतर १० ते १२ दिवस उलटूनही उगवण न झाल्याने लाखो रुपयांचा खर्च करूनही शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या गंभीर समस्येची दखल घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व युवासेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख नंदू कराडे यांच्या नेतृत्वाखाली तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला घेराव घालून निवेदन देण्यात आले होते. या आंदोलनाची गंभीर दखल घेत तालुका कृषी अधिकारी कार्यालय (गुण नियंत्रण कक्ष), चिखली यांनी सविस्तर चौकशी करून संबंधित दोषी कंपन्यांवर धडक कायदेशीर व तांत्रिक कारवाई सुरू केली आहे. बोगस बियाण्यांचा आकडा आणि कंपन्यांची नावे: गुण नियंत्रण कक्षाच्या १५ जुलै २०२६ पर्यंतच्या अहवालानुसार, तालुक्यातून एकूण ४८ अधिकृत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये विविध नामांकित कंपन्यांच्या बियाण्यांचा समावेश आहे: महाबीज (MSSC): सर्वाधिक २१ तक्रारी प्राप्त. (४ नमुने प्रयोगशाळेत पाठवले) अंकुर सीड्स (Ankur Seeds): १७ तक्रारी प्राप्त. (१० नमुने प्रयोगशाळेत पाठवले) पार्श्व जेनेटिक्स (Parshav Genetics): ९ तक्रारी प्राप्त. बुस्टर प्लांट जेनेटिक्स (Booster Plant): २ तक्रारी प्राप्त. ईगल सीड्स (Eagle Seeds): २ तक्रारी प्राप्त. रवी सीड्स (Ravi Seeds): २ तक्रारी प्राप्त. बन्सल ॲग्रो, दफ्तरी आणि यशोदा सीड्स: प्रत्येकी १ तक्रार प्राप्त प्राप्त ४८ तक्रारींपैकी ५५ तक्रारींची (पूर्वीच्या व चालू) पूर्णतः तपासणी झाली असून, उर्वरित ३ तक्रारींची तपासणी पुढील दोन दिवसांत पूर्ण केली जाणार आहे. तसेच, चिखली तालुक्यात एकूण ४७ नमुने लॅब चाचणीसाठी काढण्यात आले असून, पंचायत समिती चिखली यांच्यामार्फत ४५ नमुने काढण्यात आले आहेत.
कृषी विभागाने केलेली तात्काळ कारवाई: युवासेनेच्या तीव्र आंदोलनानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागाने पुढीलप्रमाणे कडक पावले उचलली आहेत: १. विक्री बंद आदेश (Stop Sale Order): ज्या बियाण्यांची उगवण क्षमता ७० टक्के पेक्षा कमी आहे, अशा ३ विक्रेत्यांना 'विक्री बंद आदेश' देण्यात आले आहेत. २. कारण दाखवा नोटीस: उगवण क्षमता कायदेशीर मानकापेक्षा कमी भरल्यामुळे सर्व संबंधित विक्रेते व उत्पादक कंपन्यांना कारण दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. ३. गुन्हे दाखल होणार: ज्या बियाण्यांची उगवण क्षमता उत्पादक कंपनीने दाव्यापेक्षा कमी असेल, अशा उत्पादक कंपन्या आणि विक्रेत्यांवर थेट 'केसेस' (गुन्हे) दाखल करण्यात येणार आहेत. ४. पंचनामे आणि भरपाई प्रक्रिया: कृषी विभागाच्या भरारी पथकांमार्फत आणि कृषी सहाय्यकांद्वारे थेट शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पंचनामे करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे. दोषी कंपन्यांकडून किंवा विक्रेत्यांमार्फत बाधित शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळवून देण्याच्या दृष्टीने कारवाई केली जात आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू: युवासेना या (Chikhali Bogus Soybean Seeds) संपूर्ण कारवाईवर बोलताना युवासेना जिल्हाप्रमुख नंदू करहाडे म्हणाले की, "बुलढाणा जिल्ह्यातील आणि चिखली तालुक्यातील कष्टकरी शेतकऱ्यांची फसवणूक आम्ही सहन करणार नाही. कृषी विभागाने कारवाई सुरू केली असली तरी आमचा पाठपुरावा इथेच थांबणार नाही. प्रत्येक बाधित शेतकऱ्याला नुकसानभरपाई, मोफत बियाणे मिळेपर्यंत आणि बोगस बियाणे विकणाऱ्या कंपन्यांना जेलमध्ये पाठवेपर्यंत युवासेना शांत बसणार नाही." तालुका कृषी अधिकारी (गुण नियंत्रण) डी. एल. लंबे यांनी स्पष्ट केले आहे की, कृषी विभाग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून, बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर कोणतीही गय न करता कडक कायदेशीर कारवाई करण्यास कटिबद्ध आहे. या यशस्वी आंदोलनात शहरप्रमुख श्रीराम झोरे, शहर संघटक प्रीतम गैची, युवासेना शहरप्रमुख आनंद गैची यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे असंख्य पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.