परभणीत नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकर्याची आत्महत्या...!
विषारी द्रव केले प्राशन, पेगरगव्हाण येथील शेतकरी
परभणी (Parbhani Farmer Suicides) : सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकर्याने विषारी द्रव प्राशन केले. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता शेतकर्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी २२ जुलैला दैठणा पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. मयत शेतकरी हा परभणी तालुक्यातील पेगरगव्हाण येथील रहिवाशी आहे. शरद गव्हाणे यांनी खबर दिली आहे. त्यांचा भाऊ रामेश्वर रघुनाथ गव्हाणे वय ३५ वर्ष यांनी सततच्या (Parbhani Farmer Suicides) शेतीच्या नापिकीला आणि बँकेच्या कर्जबाजारीपणाला कंटाळून विषारी द्रव प्राशन केले. त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजी नगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान २० जुलै रोजी सदर शेतकर्याचा मृत्यू झाला. प्रकरणाचा तपास सपोउपनि. फड करत आहेत.
पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू परभणी : नदी घाटावर आंघोळीसाठी गेलेल्या एकाचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. ही घटना २१ जुलै रोजी सकाळी दहाच्या सुमारास गंगाजी बापू जवळील गोदावरी नदीपात्र पिंपळगाव लिखा शिवार ता. पूर्णा येथे घडली. रंगनाथ मुळे यांनी खबर दिली आहे. मधुकर डिगांबर काळे वय ३५ वर्ष, असे मयताचे नाव आहे. या प्रकरणी चुडावा पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तपास पोह. काकडे करत आहेत.