Farm Loan Waiver Yojana: महाराष्ट्र सरकारचा 'पुण्य

मानोरा तालुक्यात ११७ गावातील ७४७४  शेतकऱ्यांना मिळणार कर्जमुक्तीचा लाभ

Farm Loan Waiver Yojana

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर

मानोरा (Farm Loan Waiver Yojana) : महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील बळीराजाला मोठा दिलासा देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ च्या अंमलबजावणीला मानोरा तालुक्यातही आता वेग आला आहे.  या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात मानोरा तालुक्यातील ११७ गावातील ७ हजार ४७४ पात्र थकबाकीदार लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली यादी बँका व ग्रामपंचायत स्तरावर अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे.       राज्य सरकारने या योजनेद्वारे थकीत पीककर्ज असलेल्या शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंतची कर्जमुक्ती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.  तालुक्यातील अकोला- वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच विविध संस्थांच्या विकास कार्यरत सेवा सहकारी संस्था व बँकांद्वारे कर्ज घेतलेल्या पात्र शेतकऱ्यांची माहिती शासनाच्या ‘महाआयटी’ पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती. त्यानुसार तालुक्यातील पहिल्या टप्प्यातील पात्र ७ हजार ४७४  शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.  शेतकऱ्यांनी लाभ मिळवण्यासाठी अग्रीस्टॅक नोंदणी, आधार प्रमाणीकरण करण्यापूर्वी सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी आपले अग्रीस्टॅक फार्मर आयडी नोंदवणे किंवा तयार करणे आवश्यक आहे, ई-केवायसी - आधार प्रमाणीकरण व ई-केवायसी पूर्ण करणे अनिवार्य आहे. यासाठी शेतकरी आपला आधार कार्ड व त्यावर लिंक असलेला मोबाईल क्रमांक घेऊन सेतू सुविधा केंद्र किंवा बायोमेट्रिकद्वारे बँकेच्या शाखेमार्फत ई-केवायसी पूर्ण करणे गरजेचे आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ पात्र शेतकऱ्याची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून मानोरा तालुक्यातील ११७ गावातील ७४७४ पात्र शेतकऱ्यांची गावपातळीवर यादी प्रसिद्ध करून पंचनामा करण्यात आले आहे  लाभार्थी शेतकऱ्यांनी ई केवायसी करण्याकरता आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे व केंद्रावर कोणतेही शुल्क न देता विनामूल्य माहिती भरून पात्र शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीचा लाभ घ्यावा यासाठी कोणतेही शुल्क देऊ नये, असे आवाहन  सहाय्यक निबंधक, गजानन फाटे व सहाय्यक सहकार अधिकारी संजय सांगळे यांनी केले आहे.