Farm Loan Waiver Scheme: ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी ह

कर्जमुक्ती योजनेत घोळ, बँक खात्यातील आणि यादीतील रक्कमेत मोठी तफावत!

Farm Loan Waiver Scheme

कृषिमंत्र्यांना निवेदन  मानोरा (Farm Loan Waiver Scheme) : राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या यादीतील कर्ज रक्कम आणि बँक खात्यात जमा होणाऱ्या रकमेमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळून येत असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ने केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पक्षाने दिला आहे.   शिवसेनेचे तालुका तालुका प्रमुख रविंद्र पवार आणि तालुका संघटक बाळू  राठोड यांनी उपविभागीय अधिकारी, कारंजा लाड यांच्यामार्फत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने २ लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर केल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. परंतु आधार प्रमाणीकरण करताना अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात यादीतील रकमेपेक्षा कमी रक्कम जमा होत असल्याचे समोर आले आहे.   तालुक्यातील अनेक शेतकरी यामुळे संभ्रमावस्थेत असून त्यांच्यात तीव्र नाराजी आहे. हा बँकांचा घोळ आहे की निष्काळजीपणा, याची चौकशी करून संबंधित बँक व्यवस्थापनावर योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच सर्व पात्र शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी या प्रकरणाची सखोल पडताळणी करून तफावत त्वरित दूर करावी. अन्यथा या गंभीर प्रकरणात शासनाने संबंधित बँकेवर कोणतीही कारवाई केली नाही, तर शेतकऱ्यांमध्ये शासन आणि बँक प्रशासनाबाबत संशय निर्माण होईल. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मानोरा तालुक्याच्या वतीने तालुक्यातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असेही पवार आणि राठोड यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे.