बोगस बियाणे विरोधात क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक
कृषि अधिक्षक कार्यालय परिसरात उधळल्या नोटा
हिंगोली (Bogus seeds Protest) : जिल्ह्यात सर्रास बोगस बियाणांची विक्री सुरू असुन कृषि विभाग डोळेझाक करीत आहे, असा आरोप करून कारवाईसाठी पैसे लागत असतील तर ‘ह्या घ्या नोटा’ असे सांगुन संघटनेच्या पदाधिकार्यांनी कृषि कार्यालय परिसरात नोटा उधळल्या. उगवणीच्या काळात ‘पेरले पण उगवलेच नाही’ अशी जिल्ह्यात अनेक शेतकर्यांची अवस्था झाली आहे. या विरोधात क्रांतिकारी शेतकरी संघटनेने आक्रमक पावित्रा घेतला आहे. प्रशासनाचा निषेध नोंदवण्यासाठी आंदोलकांनी कार्यालयासमोर प्रतीकात्मक स्वरूपात पैसे फेकून तीव्र संताप व्यक्त केला. 'जर कारवाई करण्यासाठी पैसेच लागत असतील तर आम्ही पैसे द्यायलाही तयार आहोत. मात्र शेतकर्यांना लुटणार्या बोगस बियाणे व बोगस जैविक कीटकनाशक विक्रेत्यांवर तात्काळ कठोर कारवाई करा' अशी भूमिका संघटने मांडली. शेतकर्यांची उघडपणे लूट होत असताना कृषी विभाग गप्प का असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.
बोगस कृषी निविष्ठा विक्रेत्यांवर तातडीने कठोर कारवाई न झाल्यास शेतकर्यांच्या न्यायासाठी मुंबईतील अरबी समुद्रात जलसमाधी आंदोलन करण्यात येईल आणि याची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकार आणि कृषी प्रशासनाची राहील असा इशारा देण्यात आला. शेतकरी लुटणार्यांना पाठीशी घालणार्यांना आता जाब द्यावाच लागेल हा लढा सुरू आहे आणि सुरूच राहणार असल्याचे संघटनेने सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, तालुका अध्यक्ष प्रवीण मते, चैतन्य चव्हाण, रमेश जाधव, प्रवीण घुमणार, विशाल पौळ यांच्यासह क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.