शेतकरी सायबर भामट्यांचा बळी; पीक कर्जाची रक्कम ऑनलाइन फसवणुकीत लंपास
घोट (Farmers Online Fraud) : घोट येथील रोजगार सेवक किशोर ढिवरुजी बुरांडे यांच्या बँक ऑफ महाराष्ट्र, घोट शाखेतील खात्यातून सायबर भामट्यांनी ऑनलाइन व्यवहाराद्वारे 99 हजार 998 रुपये लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना 17 जुलै रोजी रात्री 8.41 वाजताच्या सुमारास घडली. प्राप्त माहितीनुसार, किशोर बुरांडे यांच्या खात्यात नुकतीच पीक कर्जाची रक्कम जमा झाली होती. त्यानंतर अज्ञात सायबर भामट्यांनी ऑनलाइन व्यवहार करून प्रथम 49 हजार 999 रुपये व त्यानंतर 48 हजार 999 रुपये,अशा दोन व्यवहारांत एकूण 99 हजार 998 रुपये परस्पर काढून घेतले. खात्यातील रक्कम कमी झाल्याचे निदर्शनास येताच किशोर बुरांडे यांनी तातडीने राष्ट्रीय सायबर गुन्हे पोर्टलवर ऑनलाइन तक्रार दाखल केली.तसेच संबंधित बँक आणि यंत्रणेलाही घटनेची माहिती देण्यात आली. या (Farmers Online Fraud) घटनेमुळे घोट परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.पीक कर्जाची रक्कमही सायबर भामट्यांच्या निशाण्यावर असल्याचे या घटनेतून स्पष्ट होत आहे. त्यामुळे बँक खात्याशी संबंधित OTP, PIN, पासवर्ड,किंवा इतर गोपनीय माहिती कोणाशीही शेअर करू नये, तसेच संशयास्पद व्यवहार आढळताच नागरिकांनी तातडीने बँकेशी आणि सायबर गुन्हे शाखेशी संपर्क करावा.