Farmer Hanging Suicide: हिंगोलीच्या कोथळज गावात ३२

कर्जामुळे कोथळज येथील तरूण शेतकर्‍याची गळफास घेऊन आत्महत्या

Farmer Hanging Suicide

हिंगोली (Farmer Hanging Suicide) : तालुक्यातील कोथळज येथील ३२ वर्षीय तरूण शेतकर्‍यावर बँक व ट्रॅक्टरचे कर्ज असल्याने तसेच मागील काही दिवसापासून पावसाने दडी मारल्याने हे कर्ज कसे फेडावे या चिंतेतून गुरूवारी कोथळज शिवारातील शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.  याबाबत मिळालेली माहिती अशी की, हिंगोली तालुक्यातील कोथळज येथील मयुर शिवाजी घुगे (३२) या तरूण शेतकर्‍याकडे ५ एकर शेती असुन त्यावरच त्याच्या कुटूंबीयाची उपजिविका भागविली जात होती. शेतीकरीता त्याने बँकेचे कर्ज तसेच ट्रॅक्टरसाठी कर्ज घेतले होते. मध्यंतरी नापिकी व सध्या पेरणी केल्यानंतर पावसाने मारलेली दडी यामुळे मयुर हे चिंतेमध्ये होते. पिक समाधानकारक न झाल्यास कर्ज कुठुन फेडावे या चिंतेमध्ये १६ जुलै गुरूवार रोजी दुपारी ३ ते ४ दरम्यान शेतामध्ये जाऊन सोबत असलेल्या देवना गिते यांना गाय बांधण्याकरीता पाठवून गळफास घेतला.

काही वेळात गिते आल्यानंतर त्यांना मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्याने तात्काळ घरच्यांना माहिती दिल्यावर सर्वच जण घटनास्थळी आले. मृतदेह जिल्हा शवविच्छेदनाकरीता जिल्हा शासकीय रूग्णालयात आणण्यात आला.  १७ जुलै रोजी शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. घटनेची माहिती हिंगोली ग्रामीण पोलिसांना मिळाली आहे. मयत मयुर घुगे यांच्या पश्चात पत्नी, आई, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.