कर्जमाफी यादी आणि बँकेच्या आकडेवारीत मोठी तफावत
'सरसकट व्याजासहीत कर्जमाफी का मुद्दालच माफ केले विनायक सरनाईक यांचा सवाल
बॅकेतील एकून रक्कम व यादीतील रक्कमेत तफावत अपुऱ्या लाभाच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक; न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा सरनाईक यांचा इशारा
चिखली (Farmer Loan Waiver List) : राज्य सरकारने सात बारा कोरा करण्याचे आश्वासन दिल्या नंतर तब्बल दोन वर्षे अभ्यास करून जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या पहिल्याच यादीत मोठ्या प्रमाणावर तांत्रिक तफावत आणि त्रुटी समोर आल्या आहेत. प्रशासनाने जाहीर केलेली यादी, केवायसी (KYC) पावती आणि बँकेकडून प्रत्यक्षात लिहून दिलेली रक्कम यामध्ये कोणतीही सुसंगती नसल्याने सर्वकाही विस्कळीत झाले आहे. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांचे कर्ज दोन लाखांच्या आत असतानाही बँका त्यावरील वरचे व्याज भरण्याचा सल्ला देत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने बळीराज्यात संतापाची लाट उसळली आहे.
या (Farmer Loan Waiver List) गंभीर प्रकारावर तातडीने तोडगा काढून शेतकऱ्यांचे २ लाखांपर्यंतचे सरसकट आणि विनाअट कर्ज माफ करावे, या मागणीसाठी क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे नेते तथा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कार्यकारी परिषद सदस्य विनायक सरनाईक, नितिन राजपुत यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, बुलढाणा यांच्याकडे शेतकऱ्यांसह अधिकृत निवेदन सादर केले असून, न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.तर शासनाने मुद्दाल रक्कम देऊ केली तर उर्वरित रक्कम बॅका भरणार का शेतकरी भरणार याबाबत बॅकांना स्पष्ट सुचना देण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.
शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी निवेदनात नमूद केले आहे की, अनेक शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात घेतलेल्या कर्जाच्या रक्कमेपेक्षा खूपच कमी रक्कम कर्जमाफीच्या यादीत दिसत आहे. प्रशासकीय यादी, केवायसी पावती आणि बँकेची माहिती यात मोठी तफावत असून बॅकांनी याबाबत सविस्तर माहिती देत नसल्याने शेतकरी शेतकऱ्यांनी के वाय सी करावी कि पोर्टलवर तक्रार दाखल करावी हे कळायला मार्ग उरला नाही.यादीत नावे आली असली तरी रक्कम अर्धीच दर्शवली जात आहे. यामुळे "नेमकी कोणती रक्कम माफ झाली आणि उर्वरित रकमेचे करायचे काय?" असा यक्षप्रश्न उभा ठाकला आहे. त्यातच, ज्यांचे कर्ज दोन लाखांच्या आत आहे, त्यांना बँकांकडून वरचे व्याज भरण्याची तंबी(सल्ला) दिली जात असल्याने शेतकरी दुहेरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. तसेच, केवायसी पूर्ण असणाऱ्यांची नावेही यादीतून गायब असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत.
एकीकडे निसर्गाचा लहरीपणा, वाढता उत्पादन खर्च आणि दुसरीकडे कर्जाचा डोंगर अशा दुहेरी फेऱ्यात अडकलेल्या बळीराजाला या अपुऱ्या लाभामुळे मोठा मानसिक धक्का बसला आहे. "कर्जमाफी हा शेतकऱ्याचा हक्क आहे, उपकार नाही," असे स्पष्ट करत विनायक सरनाईक यांनी शासनाच्या सदोष अंमलबजावणीवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
या (Farmer Loan Waiver List) गोंधळामुळे शासनाची प्रतिमा मलीन होत असून, तिढा न सुटल्यास आंदोलनाचा एल्गार पुकारण्यात येणार आहे. निवेदनाद्वारे खालील मागण्या करण्यात आल्या आहेत: १. कर्जमाफीच्या याद्या, केवायसी पावती आणि बँकेची माहिती यामधील तफावत तातडीने तपासून दुरुस्त करण्यात यावी. २. यादीत नाव असलेल्या प्रत्येक पात्र शेतकऱ्याचे २ लाख रुपयांपर्यंतचे संपूर्ण कर्ज (मुद्दल + व्याज) विनाअट माफ करण्याचे आदेश संबंधित बँकांना द्यावेत. ३. कमी रक्कम दिसण्याचे कारण, उर्वरित रकमेबाबत लेखी खुलासा देणे आणि कर्ज दोन लाखांच्या आत असताना व्याज भरण्यास सांगणाऱ्या बँकांची चौकशी करावी. ४. दोन लाखांच्या आतील कर्ज असलेल्या शेतकऱ्यांकडून कोणतीही अतिरिक्त व्याजाची रक्कम बॅकांनी बळजबरीने वसूल करू नये.याबाबत शेतकऱ्यांना योग्य अशी माहिती द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे
मागण्या मान्य न झाल्यास शेतकऱ्यांसमवेत संबंधित बँक, सहायक निबंधक किंवा जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा सज्जड इशारा क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक, नितिन राजपुत यांच्यासह शेतकऱ्यांनी दिला आहे.
आकडे चेक करूणच शेतकऱ्यांनी के वाय सी करावी तफावत असल्यास पोर्टलवर तक्रार नोंदवा: विनायक सरनाईक
शेतकऱ्यांचे कर्जमाफी यादीमध्ये नाव आले आहे.त्यामुळे शेतकरी के वाय सी करायला सि एस सी सेंटरवर गर्दी करीत आहेत.मात्र शेतकऱ्यांनी संबंधित बॅकेत आपली मुद्दल रक्कम एकून व्याज तपासून त्यामध्ये तफावत दिसून आल्यास तर के वाय सी करतांना तक्रारीचे ऑप्शन निवडावे जेणेकरून सदरील तक्रार ही तक्रार निवारण समितीला वर्ग होईल त्यामुळे के वाय सी करतांना यादीमधील व बॅकेतील मुद्दल व व्याजाची रक्कम जुळत असेल तरच के वाय सी करावी असे आवाहन विनायक सरनाईक यांनी केले आहे.