केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पंतप

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर ठाकरे-मनसेची संयुक्त पत्रकार परिषद; तिरंगा मार्चचे विजयोत्सवात रूपांतर

Tiranga March

राजीनाम्याबाबत स्पष्टता मागितली; विद्यार्थ्यांवरील कारवाई, पोलिसांच्या भूमिकेची चौकशी आणि तिरंगा मार्चचे विजयोत्सवात रूपांतर करण्याची घोषणा

मुंबई : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा सादर केल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत सरकारवर तीव्र टीका केली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे कौतुक करत हा विजय देशातील तरुणांचा असल्याचे म्हटले.

उद्धव ठाकरे म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून देशातील वातावरण अस्वस्थ होते. अभिजीत दिपके, आंदोलनात सहभागी झालेले विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी सातत्याने लढा दिल्यामुळे हा टप्पा गाठता आला. मात्र हा संघर्ष केवळ एका मंत्र्यांच्या राजीनाम्यापुरता मर्यादित नसून, गेल्या अनेक वर्षांपासून विविध प्रश्नांवर जनतेत असलेल्या नाराजीचे हे प्रतिबिंब असल्याचे त्यांनी नमूद केले.

तरुणांच्या आंदोलनाचा विजय झाला. धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा द्यायला तरुणांनी भाग पाडलं. आम्ही कोणाचं ऐकणार नाही, कोणाशी बोलणार नाही, आम्हाला कोणी सांगायचं नाही असा या सरकारचा जो माज होता तो या आंदोलकानी उतरवला. यासाठी या देशातील तमाम तरुण-तरुणीचं आणि त्यांच्या पालकांचं… pic.twitter.com/H0YZD5VVAI

— Raj Thackeray (@RajThackeray) July 25, 2026

राजीनाम्याबाबत अद्याप संभ्रम असल्याचे सांगत ठाकरे म्हणाले की, धर्मेंद्र प्रधान यांनी खरोखर राजीनामा दिला आहे की त्यांचा केवळ खातेबदल झाला आहे, याबाबत अधिकृत स्पष्टता आवश्यक आहे. त्यांनी राजीनाम्याचे पत्र सार्वजनिक केले असले तरी त्यानंतरच्या निर्णयाबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमार आणि महिलांशी झालेल्या गैरवर्तनाचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी या घटनांवर कठोर कारवाईची मागणी केली. पोलिसांसह साध्या वेशातील कथित व्यक्तींनी केलेल्या कारवायांची चौकशी व्हावी, तसेच विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, असे ते म्हणाले. या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

युवाशक्ती एकत्र आली तर मोठा बदल घडवून आणू शकते, याचे हे उदाहरण असल्याचे ठाकरे म्हणाले. देशातील तरुणांनी आपल्या संघर्षातून लोकशाहीतील जनशक्तीचे सामर्थ्य दाखवून दिले असून, देशात क्रांतीची ठिणगी अद्याप जिवंत असल्याचे त्यांनी नमूद केले.

पत्रकार परिषदेत मनसेच्या वतीनेही विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे अभिनंदन करण्यात आले. देशभरातील तरुणांनी आपल्या संघर्षातून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा देण्यास भाग पाडल्याचा दावा करत, हा विजय विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा असल्याचे सांगण्यात आले.

यावेळी २६ जुलै २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा मार्चचे रूपांतर विजयोत्सव सोहळ्यात करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. पूर्वनियोजित वेळेनुसार सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे सर्वांनी एकत्र जमावे, असे आवाहन करण्यात आले. पुढील आंदोलनाची दिशा अभिजीत दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी चर्चा करून निश्चित करण्यात येईल, असेही सांगण्यात आले.