सोनम वांगचुक उपोषण समाप्त करण्याच्या तयारीत; विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी सरकारसमोर दोन अटी
जे. पी. नड्डा यांच्या रुग्णालयातील भेटीनंतर वांगचुक यांची भूमिका; विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी सरकारकडून स्पष्ट हमीची मागणी
NEET पेपरफुटी प्रकरणावरून सुरू असलेल्या आंदोलनात महत्त्वाचे वळण आले आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आपले उपोषण संपविण्याची तयारी दर्शवली असून, यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र, त्यासाठी सरकारकडून काही महत्त्वाच्या मागण्यांवर स्पष्ट आणि ठोस आश्वासन मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
NEET पेपरफुटीविरोधात गेल्या अनेक दिवसांपासून वांगचुक दिल्लीतील जंतर-मंतर येथे उपोषण करत आहेत. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी त्यांना जंतर-मंतर येथून ताब्यात घेत रुग्णालयात दाखल केले होते. रुग्णालयात उपचार सुरू असतानाही त्यांनी उपोषण कायम ठेवले होते.
AN APPEAL TO THE GOVERNMENT regarding breaking my fast…Once the assurance from govt come I will also appeal to the peacefully protesting students to halt the movement for now and enter into dialogue with the government pic.twitter.com/gR6S8woF5R
— Sonam Wangchuk (@Wangchuk66) July 22, 2026दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी रुग्णालयात जाऊन सोनम वांगचुक यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती वांगचुक यांच्याकडे केली. त्यानंतर सरकारकडून ठोस आश्वासन मिळाल्यास आपण उपोषण समाप्त करण्यास तयार असल्याचे वांगचुक यांनी स्पष्ट केले.
कोणत्या मागण्यांवर ठोस आश्वासनाची अपेक्षा?
सोनम वांगचुक यांनी सरकारसमोर दोन प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. त्यामध्ये NEET परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना योग्य भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच, शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासह या प्रकरणातील जबाबदारी निश्चित करण्यासाठी संसदेत अर्थपूर्ण आणि सखोल चर्चा व्हावी, अशीही त्यांनी सरकारकडे मागणी केली आहे.