मोदींच्या दौऱ्याआधीच संकट; पचपद्रा रिफायनरीत २४ तास आधी भीषण आग
राजस्थान (Pachpadra Refinery) राजस्थानमधील पचपद्रा रिफायनरी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित उद्घाटनाच्या अवघ्या २४ तास आधी भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीतून मोठ्या प्रमाणात काळा धूर आकाशात पसरल्याचे दिसून आले.
या घटनेनंतर केंद्रीय तेल मंत्रालयाने पंतप्रधानांच्या हस्ते होणारे उद्घाटन पुढे ढकलण्यात आल्याची माहिती दिली. आग नियंत्रणात आणण्यात यश आले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले. तसेच, आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली असून आवश्यक सुधारात्मक उपाययोजना केल्या जाणार आहेत.
ही रिफायनरी देशातील पहिली ‘ग्रीनफिल्ड इंटिग्रेटेड रिफायनरी-कम-पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स’ असून हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि राजस्थान सरकार यांचा संयुक्त प्रकल्प आहे. देशाच्या ऊर्जा सुरक्षेला बळकटी देण्यासाठी आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी या प्रकल्पाला महत्त्वपूर्ण मानले जाते.
या प्रकल्पाचा शिलान्यास २२ सप्टेंबर २०१३ रोजी सोनिया गांधी यांच्या हस्ते झाला होता. त्यावेळी राज्यात अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत होते आणि प्रकल्पाचा अंदाजित खर्च ३७,२३० कोटी रुपये होता. नंतर सत्तांतरानंतर १६ जानेवारी २०१८ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाचे पुनःलोकार्पण करत खर्च ४३,१२९ कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आला.
इंधन उत्पादनासोबतच या रिफायनरीतून मोठ्या प्रमाणात पेट्रोकेमिकल उत्पादनेही निर्माण होणार आहेत. यामध्ये पॉलीप्रॉपिलीन, पॉलीइथिलीन (HDPE/LLDPE), बेंझीन, टोल्युईन आणि ब्यूटाडायीन यांसारख्या उत्पादनांचा समावेश असेल. या कच्च्या मालावर आधारित विविध उद्योगांना चालना मिळणार असून प्लास्टिक फर्निचर, शेतीसाठी पाईप्स, पॅकेजिंग फिल्म्स, वाहनांचे सुटे भाग, सिंथेटिक फायबर्स, वैद्यकीय उपकरणे तसेच पेंट्स आणि डिटर्जंट्ससारख्या रसायनांच्या उत्पादनाला मोठा आधार मिळणार आहे.
या सर्वसमावेशक विकासामुळे राजस्थानमध्ये औद्योगिक परिसंस्था अधिक मजबूत होण्यास मदत होणार असून, मूल्यवर्धित उत्पादनांच्या क्षेत्रात राज्य राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवर उदयोन्मुख केंद्र म्हणून पुढे येण्याची अपेक्षा आहे.