परीक्षा सुधारणा विधेयकावर राज्यसभेत सरकारला खरगेंचे घेराव; अमित शाह यांच्या राजीनाम्याचीही मागणी
जंतर मंतर विद्यार्थी आंदोलन, लाठीचार्ज आणि पॅलेट गनच्या वापरावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका; धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा विद्यार्थ्यांच्या संघर्षाचा विजय असल्याचा दावा
नवी दिल्ली : लोकसभेची मंजुरी मिळाल्यानंतर परीक्षा सुधारणा विधेयक गुरुवारी (दि. ३०) राज्यसभेत चर्चेसाठी मांडण्यात आले. या चर्चेदरम्यान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्यसभा खासदार मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. शेरो-शायरीचा आधार घेत त्यांनी परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी, विद्यार्थी आंदोलन आणि जंतर मंतर येथील कारवाईवरून सरकारला लक्ष्य केले.
चर्चेदरम्यान खरगे म्हणाले, "विद्यार्थी रडत राहिले आणि पेपर चोरणारे हसत राहिले." नव्या परीक्षा सुधारणा विधेयकामुळे परिस्थितीत मोठा बदल होणार नसल्याचा दावा करत त्यांनी सांगितले की, या कायद्यात प्रामुख्याने दंड आणि शिक्षेची तरतूद वाढविण्यात आली असून त्यामुळे मूळ समस्येवर उपाय होणार नाही.
जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जाच्या घटनेचा उल्लेख करत खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. या गंभीर प्रकरणावर ना पंतप्रधान बोलत आहेत, ना गृहमंत्री सभागृहात भूमिका मांडत आहेत, अशी टीका त्यांनी केली. हजारो विद्यार्थी शांततापूर्ण मार्गाने संसदेकडे मोर्चा घेऊन गेले होते. सरकारशी संवाद साधण्याचा त्यांचा प्रयत्न होता; मात्र त्यांच्यावर लाठीचार्ज, अश्रुधूर आणि पॅलेट गनचा वापर करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. याशिवाय रेल्वे स्थानके, मेट्रो आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा संताप निर्माण झाल्याचेही त्यांनी सांगितले.
'पॅलेट गनचा आदेश कोणी दिला?'
विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज आणि पॅलेट गन वापरण्याचा आदेश नेमका कोणी दिला, असा थेट प्रश्न खरगे यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे उपस्थित केला. "बंद खोलीत तुम्ही माझे बोलणे ऐकत असाल, पण कायम लपून राहू शकत नाही. एक दिवस आम्ही तुम्हाला बाहेर आणून जनतेसमोर उभे करू," असे वक्तव्य त्यांनी केले. त्यांच्या या विधानानंतर सभागृहात सत्ताधारी सदस्यांनी गोंधळ घातला.
'प्रधानांचा राजीनामा हा विद्यार्थ्यांच्या संघर्षाचा परिणाम'
देशभरातील विद्यार्थी आणि तरुणांनी परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींविरोधात आवाज उठवला, तर विरोधी पक्षांनी हा मुद्दा रस्त्यापासून संसदेपर्यंत पोहोचवला, असे खरगे म्हणाले. वाढत्या दबावामुळे सरकारला विद्यार्थ्यांसमोर झुकावे लागले आणि अखेर पंतप्रधानांना केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून हटवावे लागले, असा दावा त्यांनी केला. सरकारने स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठीच प्रधानांचा राजीनामा घेतला, असा आरोपही त्यांनी केला.
अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
खरगे यांनी दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या कारवाईबाबत अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली. २० जुलै रोजी हजारो विद्यार्थी संसदेकडे शांततापूर्ण मोर्चा घेऊन जात असताना त्यांच्यावर लाठीचार्ज, अश्रुधूर, वॉटर कॅनन, पॅलेट गन, करंट असलेली बॅरिकेड्स आणि खिळे असलेल्या अडथळ्यांचा वापर करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच मेट्रो आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाल्याचे त्यांनी नमूद केले.
या कारवाईत १०० हून अधिक विद्यार्थी आंदोलक जखमी झाल्याचा दावा करत काही विद्यार्थ्यांचे डोळे, कान, हात आणि पाय यांना गंभीर दुखापती झाल्याचे त्यांनी सांगितले. या संपूर्ण घटनेची जबाबदारी गृहमंत्र्यांनी स्वीकारावी आणि त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही खरगे यांनी सभागृहात केली.