NEET परीक्षेतील फेरफार आणि अनियमिततेविरोधात दिल्ली

सोनम वांगचुक यांना जंतरमंतरवरून हटवले; CJP संस्थापक अभिजीत दिपके यांचे आमरण उपोषण जाहीर

Jantar Mantar

जंतरमंतरवरील NEET आंदोलनादरम्यान पोलिसांनी वांगचुक यांना रुग्णालयात हलवले; आंदोलन आणखी तीव्र होण्याचे संकेत

नवी दिल्ली : NEET परीक्षेतील फेरफार आणि अनियमिततेविरोधात दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला शनिवारी (18 जुलै) सकाळी नवे वळण मिळाले. आंदोलनस्थळी उपोषणाला बसलेले पर्यावरणशास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी तेथून हटवून रुग्णालयात दाखल केले. या कारवाईनंतर आंदोलनस्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला असून, 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आमरण उपोषण सुरू करण्याची घोषणा केली आहे.

#WATCH | Delhi: Activist Sonam Wangchuk, who was sitting on a hunger strike from last 20 days at Jantar Mantar, taken to the hospital by the police. More details awaited. pic.twitter.com/81DTO3cyh4

— ANI (@ANI) July 18, 2026

अभिजीत दिपके यांनी सांगितले की, ते आजपासून बेमुदत उपोषण सुरू करत असून 20 जुलै रोजी नियोजित मोर्चाही काढण्यात येणार आहे. "सोनम सर यांना येथून हलवले म्हणून हे आंदोलन थांबेल, असा गैरसमज प्रशासनाने करू नये. हे आंदोलन सुरूच राहणार आहे," असे त्यांनी म्हटले. याचवेळी त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. तसेच, वांगचुक यांना शिवीगाळ करण्यात आली आणि आपल्यालाही मारहाण झाल्याचा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी जंतरमंतरवरून सोनम वांगचुक यांना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात हलवले. त्यानंतर CJPच्या कार्यकर्त्यांनाही आंदोलनस्थळावरून हटवण्यात आले. याबाबत अभिजीत दिपके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत, दिल्ली पोलिसांनी मारहाण करून ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे.

Abhijeet Dipke; "If they think that taking Sonam Sir away will end this movement, they are mistaken. We will remain here, and will march to Parliament on July 20." pic.twitter.com/GKvaIbcLK9

— Cockroach Janta Party (@CJP_for_India) July 18, 2026

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या या आंदोलनावर झालेल्या पोलिस कारवाईविरोधात CJP कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. आंदोलनस्थळी पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

या संपूर्ण घडामोडी अशा वेळी घडल्या, जेव्हा सोनम वांगचुक यांच्या ढासळलेल्या प्रकृतीसंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. अवघ्या दोन दिवसांपूर्वी न्यायालयाने त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करत प्रशासनाला दररोज वैद्यकीय तपासणी सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले होते.

उच्च न्यायालयाने आपल्या निरीक्षणात कोणत्याही नागरिकाचा जीव सर्वात महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट करत, वांगचुक यांच्या आरोग्यावर सातत्याने लक्ष ठेवावे आणि गरज भासल्यास आवश्यक वैद्यकीय उपचार तातडीने उपलब्ध करून द्यावेत, असे केंद्र सरकारला निर्देश दिले होते.

शुक्रवारी वांगचुक यांची तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर आणि वैद्यकीय आणीबाणीच्या स्थितीत असल्याचे नमूद केले होते. सलग 20 दिवस उपोषणामुळे त्यांचे 9 किलोपेक्षा अधिक वजन घटल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शरीरातील ग्लुकोज आणि फॅट्स जवळपास संपल्याने स्नायूंची झीज सुरू झाली असून, उपोषण त्वरित थांबवले नाही तर महत्त्वाचे अवयव निकामी होण्याचा आणि जीवाला गंभीर धोका निर्माण होण्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.