वांगचुक यांच्या पत्नी गितांजली अंगमो यांनी रुग्णा

सोनम वांगचुक यांची पत्नी गितांजली अंगमो यांची सफदरजंग रुग्णालयावर गंभीर शंका; वांगचुकांसाठी दुसऱ्या रुग्णालयाची मागणी

नवी दिल्ली : नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतर-मंतर येथे उपोषण करणारे पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी आंदोलनस्थळावरून हलवून सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यानंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. वांगचुक यांच्या पत्नी गितांजली अंगमो यांनी रुग्णालय प्रशासनाला पत्र लिहून त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याची मागणी केली असून, उपचार प्रक्रियेबाबत गंभीर शंका व्यक्त केली आहे.

सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा जंतर-मंतर येथे २१ वा दिवस सुरू असतानाच दिल्ली पोलिसांनी त्यांना अॅम्ब्युलन्सद्वारे सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांच्या पत्नी गितांजली अंगमो यांनी रुग्णालयाच्या अधीक्षकांना पत्र पाठवत, त्यांच्या परवानगीशिवाय कोणतेही इन्ट्राव्हेनस इंजेक्शन किंवा उपचार देऊ नयेत, अशी स्पष्ट विनंती केली आहे.

#WATCH | Delhi: Activist Sonam Wangchuk's wife, Gitanjali J Angmo, says, "Regarding the High Court order, the order never mandated hospitalization. It simply stated that an individual's health is paramount and must be monitored at regular intervals; it did not order… pic.twitter.com/Snh7R0Iw5r

— ANI (@ANI) July 18, 2026

गितांजली अंगमो यांनी आपल्या पत्रात आणखी एक गंभीर आरोप केला आहे. वांगचुक यांच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल मागूनही रुग्णालय प्रशासनाकडून त्याची प्रत उपलब्ध करून दिली जात नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच आंदोलनादरम्यान वांगचुक यांची तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनाही आता भेटण्याची परवानगी दिली जात नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

रुग्णालय प्रशासन उपचार प्रक्रियेत अपेक्षित पारदर्शकता दाखवत नसल्याचा आरोप करत गितांजली अंगमो यांनी वांगचुक यांना तातडीने डिस्चार्ज देण्यात यावा, जेणेकरून त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवता येईल, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या उपोषणादरम्यान पोलिसांनी सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हलविल्यानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या कारवाईमुळे आंदोलनाला नवीन वळण मिळाले आहे.

याचदरम्यान, आंदोलनाशी संबंधित अभिजीत दिपके यांनी दावा केला की, सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हलविण्याच्या वेळी ते घटनास्थळी उपस्थित नव्हते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना नजरकैदेत ठेवले होते आणि वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतरच त्यांची सुटका करण्यात आली. त्यानंतर अभिजीत दिपके यांनी पुन्हा आंदोलनस्थळी जाऊन उपोषण सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला.