सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथील जिल्हा परिषद

गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे पानकनेरगाव जिल्हा परिषद शाळेकडे पालकांचा वाढता ओढा

Zilla Parishad School

प्रवेशसंख्येत लक्षणीय वाढ; शिक्षकांच्या समर्पित प्रयत्नांचे पालकांकडून कौतुक

पानकनेरगाव (ता. सेनगाव) : सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथील जिल्हा परिषद माध्यमिक व केंद्रीय प्राथमिक शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे परिसरात आदर्श शाळा म्हणून ओळख निर्माण करत आहे. शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासोबतच सर्वांगीण विकासावर भर देत उत्कृष्ट अध्यापन करत असल्याने पालकांमधून शिक्षकांच्या कार्याचे कौतुक होत आहे.

विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया अधिक भक्कम व्हावा, त्यांना प्रत्येक विषयाचे सखोल ज्ञान मिळावे आणि परीक्षांमध्ये चांगले यश संपादन करता यावे, यासाठी शिक्षक नियमित तासिकांव्यतिरिक्त अतिरिक्त (एक्स्ट्रा) वर्गही घेत आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाविषयी आवड वाढत असून त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेतही सकारात्मक बदल दिसून येत आहे.

शिक्षकांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे आणि शाळेतील शैक्षणिक वातावरणामुळे यावर्षी प्रवेशसंख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. आपल्या पाल्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने अनेक पालकांनी झेडपीच्या शाळेला पसंती दिली आहे.

शिस्त, गुणवत्तापूर्ण अध्यापन, विद्यार्थीकेंद्रित उपक्रम आणि शिक्षकांची समर्पित सेवा यामुळे पानकनेरगाव येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा ग्रामीण भागातील इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरत असून, पालकांकडून मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षकांचे अभिनंदन आणि कौतुक केले जात आहे.

प्रतिक्रिया : जि.प. माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक अनिल देशमुख

"आमच्या जिल्हा परिषद शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थीकेंद्रित अध्यापन पद्धती, नियमित उपक्रम आणि शिक्षकांचे समर्पित प्रयत्न यामुळे पालकांचा शाळेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. शिक्षक विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित न ठेवता त्यांचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे यावर्षी प्रवेशसंख्येत लक्षणीय वाढ झाली असून विद्यार्थ्यांचा ओढा जि.प. शाळेकडे वाढलेला दिसून येत आहे. ही बाब आमच्यासाठी अभिमानास्पद असून भविष्यातही दर्जेदार शिक्षण देण्याचा आमचा संकल्प कायम राहील."

प्रतिक्रिया : पालक सुनील देशमुख

"जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देऊन दर्जेदार शिक्षण देत आहेत. नियमित अध्यापनासोबत अतिरिक्त वर्ग घेत असल्याने मुलांमध्ये अभ्यासाची आवड वाढली आहे. त्यामुळे आम्ही आमच्या पाल्यांच्या शिक्षणाबाबत समाधानी असून सर्व शिक्षकांचे मनापासून कौतुक करतो."

प्रतिक्रिया : पालक विश्वनाथ निंबलवार

"माझ्या तीन मुली झेडपी शाळेत शिक्षण घेत आहेत. शिक्षकांच्या प्रामाणिक प्रयत्नामुळे आणि शाळेतील शैक्षणिक वातावरणामुळे माझी एक मुलगी एनएमएमएस (NMMS) धारक झाली आहे."

प्रतिक्रिया : पालक शिवराज संगवार

"आमच्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देतात. त्यामुळे मुलांच्या अभ्यासात चांगली प्रगती होत आहे. म्हणून आम्ही पालक शिक्षकांच्या कार्यावर समाधानी आहोत."

प्रतिक्रिया : पालक संतोष आकमार

"शाळेतील सर्व शिक्षक मेहनती असून वेळेवर उपस्थित राहतात. तसेच आमच्या मुलांना दर्जेदार शिक्षण देत आहेत. त्यामुळे आम्ही आमच्या मुलांना झेडपी शाळेत प्रवेश दिला आहे."

प्रतिक्रिया : पालक राजेशभाऊ देशमुख

"यावर्षी प्रवेशसंख्येतही वाढ झाली आहे. आपल्या पाल्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने अनेक पालकांनी जिल्हा परिषद माध्यमिक शाळेला पसंती दिली आहे."