मुंबई-गोवा महामार्गावरील एका खासगी प्रवासी बसमध्ये

मुंबई-गोवा खासगी बसमध्ये महिला प्रवाशाचा विनयभंग; अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा

Woman Molestation

गोव्याहून मुंबईकडे येणाऱ्या बसमध्ये क्लिनरकडून दोन वेळा विनयभंगाचा आरोप; कोलाड पोलिसांकडून गुन्हा दाखल, तपासासाठी प्रकरण संगमेश्वर पोलिसांकडे

रायगड : मुंबई-गोवा महामार्गावरील एका खासगी प्रवासी बसमध्ये महिला प्रवाशासोबत विनयभंग झाल्याची गंभीर घटना समोर आली असून, या प्रकरणामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गोव्याहून मुंबईकडे येणाऱ्या खासगी बसमध्ये प्रवासादरम्यान बसच्या क्लिनरने दोन वेळा विनयभंग केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. या घटनेनंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारकडे कठोर कारवाईची मागणी करत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, गोव्याहून मुंबईकडे येणाऱ्या खासगी बसमधील प्रवासादरम्यान पहिली घटना संगमेश्वर येथे घडली. झोपेतून उठवण्याच्या बहाण्याने क्लिनरने गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर पोलादपूर परिसरात पुन्हा तिचा विनयभंग झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

घटना घडल्यानंतर संबंधित महिलेने तातडीने पोलिसांच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून तक्रार नोंदवली. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील कोलाड पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी प्रकरण संगमेश्वर पोलीस ठाण्याकडे वर्ग केले आहे.

दरम्यान, पीडित महिला ही छत्रपती संभाजीनगर परिसरातील असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची दखल घेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सामाजिक माध्यमांवर प्रतिक्रिया देत सरकारला महिलांच्या सुरक्षेबाबत कठोर भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे.

दानवे यांनी सांगितले की, गोव्याहून मुंबईकडे येणाऱ्या राजधानी ट्रॅव्हल्स कॉर्पोरेशनच्या एमएच-43-सीके-2981 क्रमांकाच्या बसमध्ये रात्री साडेतीनच्या सुमारास बसच्या कर्मचाऱ्याकडून महिला प्रवाशाला वारंवार त्रास देण्यात आल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. या प्रकरणातील संबंधित बस कोलाड (जि. रायगड) पोलिस ठाण्यात वळविण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या राजधानी ट्रॅव्हल्स कॉर्पोरेशनच्या एमएच-४३-सिके-२९८१ क्रमांकाच्या बसमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या एका महिला प्रवाशाला रात्री साडेतीनच्या सुमारास बसच्या स्टाफकडूनच तब्बल तीन वेळा त्रास दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.महिला प्रवाशांच्या सुरक्षेशी…

— Ambadas Danve (@iambadasdanve) August 3, 2026

महिला सुरक्षेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असे स्पष्ट करत दानवे यांनी सरकारने केवळ 'लाडकी बहीण'सारख्या घोषणा न करता प्रत्यक्ष कृतीतून पीडित महिलेच्या पाठीशी उभे राहावे, अशी मागणी केली. तसेच या प्रकरणात कठोर कारवाई झाली नाही तर आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.