कळमनुरी नगरपरिषदेकडून केवळ ६० दिवस पाणीपुरवठा; मात्र वर्षभराची पाणीपट्टी वसुलीचा आरोप
माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद नाजीम रजवी यांच्या मागणीची नगरविकास विभागाकडून दखल
कळमनुरी (Water Crisis) : कळमनुरी नगरपरिषदेच्या कारभाराबाबत शहरातील नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर वर्षभराची पाणीपट्टी वसूल केली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
कळमनुरी शहराला ईसापूर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असतानाही योग्य नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांना नियमित पाणीपुरवठा मिळत नसल्याची तक्रार आहे. शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा अपेक्षित असताना प्रत्यक्षात आठ ते दहा दिवसांनी पाणी येत असल्याने वर्षभरात अवघे सुमारे ६० दिवसच पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडून शहरातील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचाही आरोप नागरिकांनी केला असून, याबाबत विविध स्तरांवर तक्रारी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. अपुरा पाणीपुरवठा होत असतानाही संपूर्ण वर्षाची पाणीपट्टी वसूल केली जात असल्याने नागरिकांवर दुहेरी अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर कळमनुरी नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद नाजीम रजवी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांना निवेदन देऊन, प्रत्यक्ष पाणीपुरवठा झालेल्या दिवसांनुसारच पाणीपट्टी आकारण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
या निवेदनाची नगरविकास विभागाने दखल घेत जिल्हाधिकारी, हिंगोली यांच्याकडून अहवाल मागविला आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाने संबंधित पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्याचे समजते.
या प्रकरणाकडे आता कळमनुरीकरांचे लक्ष लागले असून, नागरिकांना नियमित व नियोजित पाणीपुरवठा कधी मिळणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.