पाण्यासाठी पंचायत समिती कार्यालयात १ मे रोजी आंदोलन सुरू!
मानोरा (Water Crisis) : तालुक्यातील शेवटच्या टोकावरील गादेगाव तांड्यावर पाणी टंचाईने नागरिक त्रस्त झाले असून, गावातील ग्राम पंचायत कार्यालयावर २२ एप्रिल रोजी घागर आंदोलन करूनही पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यामुळे १ मेपासून पंचायत समिती कार्यालयात ग्रामस्थांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना काळे झेंडे दाखवत आंदोलन सुरू केले आहे.
सुदाम भिका जाधव व ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गादेगाव हे १४०० लोकवस्तीचे गाव असून येथे ग्रामीण पाणीपुरवठा, जल जीवन मिशन आणि जीवन प्राधिकरण २८ गावांतर्गत पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे. तरीही गादेगाव तांड्यावर गटातटातील राजकारणामुळे लग्नसराईत पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
यासंदर्भात २२ एप्रिल २०२५ पर्यंत सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी माजी सरपंच भारत आडे यांच्यासह ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर घागर आंदोलन केले होते. तरीही पाणीपुरवठा सुरळीत न होता नागरिकांना पाणी टंचाईची झळ सोसावी लागत आहे.
यामुळे पाणीपुरवठा १ मे रोजीपर्यंत सुरू न झाल्याने प्रशासनाला काळे झेंडे दाखवून ग्राम पंचायत प्रशासनाचा निषेध करत आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
गावात तीन योजना आणि पाण्याची टाकी असतानाही सणासुदीला व उन्हाळ्यात लग्नसराईत पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना सकाळ-संध्याकाळ पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तांड्यातील महिलांना पाण्यासाठी डोंगर-दरी पालथी घालावी लागत असून, वाढत्या उन्हात ही समस्या अधिकच गंभीर झाली आहे.
पाण्यासाठी राजकारण करून नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. ग्रामस्थांनी या गंभीर पाणी टंचाई समस्या न सुटल्याने आंदोलन पुकारले असल्याची प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी दिली. वृत्त लिहिस्तोवर आंदोलन सुरूच होते.