वसमत शहरात खंजर बाळगणाऱ्या दोघांना अटक
हिंगोली (Wasmat Dagger Case) : जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कठोर मोहीम उघडली आहे. या मोहिमेदरम्यान वसमत शहरात खंजर बाळगणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वसमत शहरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे कारखाना रोड, वसमत येथील रहिवासी शैलेश रोहिदास राऊत आणि कोंडीबा बालाजी क्षीरसागर या दोघांना हिरो शोरूम जवळ ताब्यात घेण्यात आले. अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे धारदार व घातक खंजर आढळून आले. दोन्ही आरोपींना जागीच पकडून वसमत शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की कोणीही अवैध हत्यार बाळगू नये, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल. डॉ. नीलाभ रोहन, पोलीस अधीक्षक हिंगोली, कमलेश मीना, अप्पर पोलीस अधीक्षक हिंगोली व मोहन भोसले, पोलीस निरीक्षक स्थागुशा यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार शिवाजी जालमिरे, आकाश टापरे, ज्ञानेश्वर गोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.