Vilegaon Superstitions: तालुक्यातील विळेगाव येथे श

रहस्यमय खड्ड्यातून निघाले दोन लिंबू; विळेगावात अंधश्रद्धेचा प्रकार उघड

Vilegaon Superstitions

देदेवणी पोलिसांच्या तत्परतेने अफवांना पूर्णविराम

देवणी (Vilegaon Superstitions) : देवणी तालुक्यातील विळेगाव येथे शेतात रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तीने संशयास्पद खड्डा करून काहीतरी पुरल्याची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र देवणी पोलिसांनी विलंब न लावता दंडाधिकारी, फॉरेन्सिक पथक आणि पंचांसह घटनास्थळी धाव घेत चार फूट खोल खड्डा उकरून तपास केला. या तपासात कोणतीही संशयास्पद वस्तू न सापडता केवळ दोन लिंबू आढळून आल्याने हा प्रकार अंधश्रद्धा किंवा जादूटोण्याशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांच्या तत्पर आणि पारदर्शक कारवाईमुळे गावात पसरू पाहणाऱ्या अफवांना वेळीच आळा बसला.

मिळालेल्या माहितीनुसार, विळेगाव येथील सर्वे क्रमांक २२/३ मधील शेतात ६ जुलैच्या रात्री किंवा ७ जुलैच्या पहाटे अज्ञात व्यक्तीने एका झाडाखाली संशयास्पदरीत्या सुमारे चार फूट खोल खड्डा करून काहीतरी पुरल्याचा संशय निर्माण झाला. मंगळवारी सकाळी शेतकरी नरसिंग नागराळे व उद्धव नागराळे शेतात गेल्यानंतर त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. रात्रीच्या अंधारात असा खड्डा करून काही गंभीर वस्तू पुरण्यात आली असावी, या भीतीने त्यांनी तातडीने देवणी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन देवणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल खोडेवाड यांनी तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण आणि उपविभागीय पोलीस अधिकारी ढमे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची सूत्रे वेगाने हलविण्यात आली.

घटनास्थळी देवणीचे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी सोमनाथ वाडकर, शासकीय पंच, फॉरेन्सिक पथक, छायाचित्रकार व व्हिडिओग्राफर यांच्या उपस्थितीत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संशयित खड्डा उकरण्यात आला. ग्रामस्थांच्या नजरा या तपासाकडे लागल्या असताना खड्ड्यातून कोणतीही धोकादायक किंवा गुन्हेगारी स्वरूपाची वस्तू न सापडता केवळ दोन लिंबू आढळून आले. त्यामुळे हा प्रकार अंधश्रद्धा किंवा जादूटोण्याच्या समजुतीतून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

तपासानंतर पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. वस्तुस्थिती समोर आल्यानंतर गावातील भीतीचे वातावरण निवळले आणि ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल खोडेवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार लामतुरे, पुट्टेवाड, पवन गायकवाड आणि अभिजित यांनी यशस्वीपणे पार पाडली.

वेळेवर केलेली कारवाई, कायदेशीर प्रक्रियेचे काटेकोर पालन आणि तपासातील पारदर्शकता यामुळे देवणी पोलिसांच्या कार्यपद्धतीचे विळेगाव परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप केल्यामुळे गावात पसरू पाहणाऱ्या अफवांना पूर्णविराम मिळाला असून नागरिकांनी देवणी पोलिसांचे आभार व्यक्त केले आहेत.