महाराष्ट्राच्या राजकारणातील अनुभवी आणि रणनीतीकार न

बारामती दौऱ्यात शरद पवारांची अनोखी खेळी; बुद्धिबळाच्या पटावरील चाल ठरली चर्चेचा विषय

सुपे येथील विद्या प्रतिष्ठान शाळेला सदिच्छा भेट; विद्यार्थ्यांशी संवाद साधत शैक्षणिक उपक्रमांचे केले कौतुक

बारामती : महाराष्ट्राच्या राजकारणातील अनुभवी आणि रणनीतीकार नेते म्हणून ओळख असलेले शरद पवार पुन्हा एकदा वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. बारामती दौऱ्यावर जात असताना त्यांनी सुपे येथील विद्या प्रतिष्ठानच्या शाळेला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधताना बुद्धिबळाच्या पटावरील त्यांनी खेळलेली एक चाल सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

शरद पवार यांच्यासोबत त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनीही या शाळेला भेट दिली. शाळेत पोहोचल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत विविध शैक्षणिक आणि सहशालेय उपक्रमांची माहिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दिली दाद

भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी शाळेत सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती शरद पवार यांना दिली. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, सर्जनशील आणि कौशल्य विकासासाठी शाळा करत असलेल्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी अभ्यासक्रमाबरोबरच विविध उपक्रम प्रभावीपणे राबविले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

बुद्धिबळाच्या पटावरील चाल सोशल मीडियावर व्हायरल

याच भेटीदरम्यान एका विद्यार्थिनीने शरद पवार यांच्यासमोर बुद्धिबळाचा पट मांडला. बुद्धिबळाचा पट पाहताच त्यांनी त्यावरील परिस्थितीचा वेध घेत अत्यंत शांतपणे 'राजा' आणि 'वजीर' यांच्या चालीवर आपली बोटे ठेवत एक चाल खेळली. हा क्षण उपस्थितांनी कॅमेऱ्यात कैद केला असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. राजकीय वर्तुळातही या प्रसंगाची चर्चा रंगली आहे.

बारामतीला जात असताना सुपे येथील विद्या प्रतिष्ठानच्या शाळेला भेट दिली. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आणि त्यांनी राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा, कौशल्यांचा आणि सर्जनशीलतेचा विकास व्हावा यासाठी… pic.twitter.com/k5EQSLQK4z

— Sharad Pawar (@PawarSpeaks) July 17, 2026

सोशल मीडियावरून व्यक्त केल्या भावना

या भेटीनंतर शरद पवार यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून शाळेच्या उपक्रमांविषयी समाधान व्यक्त केले. बारामतीकडे जाताना सुपे येथील विद्या प्रतिष्ठानच्या शाळेला भेट दिल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधल्याचा उल्लेख केला.

विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्ता, कौशल्य आणि सर्जनशीलतेच्या विकासासाठी अभ्यासक्रमासोबत विविधांगी उपक्रम प्रभावीपणे राबविले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. विशेषतः या उपक्रमांमध्ये विद्यार्थिनींचा सहभाग आणि नेतृत्व उल्लेखनीय असल्याचे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले.

भावी वाटचालीसाठी शुभेच्छा

बदलत्या काळातील आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्यासाठी आवश्यक असलेली विचारक्षमता, आत्मविश्वास आणि सर्जनशीलता विद्यार्थ्यांमध्ये विकसित होत असल्याचे विद्या प्रतिष्ठानमध्ये पाहायला मिळते, असे शरद पवार यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच शिक्षकवृंद यांना भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.