आज दुपारी अडीच ते पावणे तीन वाजण्याच्या सुमारास च

अवकाळी पावसामुळे थांबवलेल्या दुचाकींवर एसटी बसची धडक; १० ते १२ मोटरसायकलींचे मोठे नुकसान

Vehicle Damage

चिखली (Vehicle Damage) : आज दुपारी अडीच ते पावणे तीन वाजण्याच्या सुमारास चिखली–बुलढाणा मार्गावर अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे एक मोठी दुर्घटना घडली. पावसापासून बचाव करण्यासाठी रस्त्यालगत बंद पडलेल्या एका हॉटेलसमोर उभ्या करण्यात आलेल्या दुचाकींवर भरधाव एसटी बस जाऊन धडकल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या अपघातात तब्बल १० ते १२ मोटरसायकलींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारच्या सुमारास अचानक जोरदार वारा व पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे चिखली–बुलढाणा मार्गाने प्रवास करणाऱ्या अनेक दुचाकीस्वारांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या बंद हॉटेलसमोर आपल्या मोटरसायकली उभ्या करून आसरा घेतला. काही नागरिक हॉटेलच्या शेडखाली थांबले होते.

याचवेळी भुसावळ डेपोची एसटी बस त्या मार्गाने जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. भरधाव बस थेट रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकींवर जाऊन आदळली. बसची धडक इतकी जोरदार होती की अनेक मोटरसायकली एकमेकांवर चिरडल्या गेल्या. काही दुचाकी पूर्णपणे नुकसानग्रस्त झाल्या असून घटनास्थळी वाहनांचे तुकडे विखुरलेले दिसून आले.

घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. अपघाताचे नेमके कारण आणि एसटी चालकाचे नियंत्रण कसे सुटले याबाबत अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त वाहनधारकांकडून संताप व्यक्त करण्यात येत असून नुकसानभरपाईची मागणी करण्यात येत आहे.