परभणीत अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू
परभणीच्या रुढी शिवारातील घटना; मयत तेलंगणा राज्यातील रहिवासी
परभणी (Parbhani Accidental Death) : मानवत तालुक्यातील रूढी शिवारात केशव जिनिंग समोर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात तेलंगणा राज्यातील २३ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवार ४ जुलै रोजी सायंकाळी ७:४५ वाजता घडली. या बाबत अधिक माहिती अशी की, तेलंगणा राज्यातील कर्नुल जिल्ह्यातील आदोनी येथील चालक शेख अल्ताफ आणि क्लिनर शेख अनवर शेख बाबा हे दोघे ट्रक क्रमांक ए.पी ०२ टी ई १२६९ ट्रक घेऊन केशव जिनींग मध्ये गठन भरून नेण्यासाठी शुक्रवार ३ जुलै रोजी आले होते. शनिवार ४ जुलै रोजी गठन लोड करून निघण्याच्या तयारीत होते.
थोडा वेळ असल्याने क्लीनर शेख अन्वर शेख बाबा हे जिनिंगच्या बाहेर मानवत -परभणी रस्त्यावर फेरफटका मारण्यासाठी आले असताना अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने या युवकाचा जागीच मृत्यू झाला. (Parbhani Accidental Death) धडक दिल्यानंतर वाहन घटनास्थळावरुन पसार झाले. त्यामुळे कोणत्या वाहनाने धडक दिली याची माहिती मिळू शकली नाही. घटनेची माहिती मिळताच पोउपनी अनिल खिल्लारे, वाशिष्ट बिक्कड, किशन पतंगे, चालक गायत्री लोखंडे, यांनी घटनास्थळी धाव घेतली.