व्यवस्थापनाकडून सातत्याने होत असलेल्या अन्यायाच्या

अल्ट्राटेक कामगारांचा प्रशासकीय कार्यालयाला घेराव; विविध मागण्यांसाठी दीर्घ चर्चेनंतर व्यवस्थापनाला ८ दिवसांचा अल्टिमेटम

कोरपना : तालुक्यातील अल्ट्राटेक सिमेंट, आवाळपूर येथील कामगारांच्या प्रलंबित मागण्या आणि व्यवस्थापनाच्या दिरंगाईच्या भूमिकेविरोधात दि. ७ जुलै रोजी एल अँड टी अल्ट्राटेक कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली शेकडो कामगारांनी कंपनीच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयाला घेराव घातला. व्यवस्थापनाकडून सातत्याने होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्पादनाच्या मुख्य कोर कामात कार्यरत कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी करण्यात यावे, सिमेंट उद्योगासाठी स्वतंत्र किमान वेतन लागू करावे, कंत्राटी कामगारांच्या वेतनात वाढ करावी, कायमस्वरूपी कामगारांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या शाळेत शिकणाऱ्या कामगारांच्या पाल्यांसाठी वाढविण्यात आलेली शैक्षणिक फी कमी करावी, तसेच व्यवस्थापनाने केवळ ३ टक्के कामगारांना दिलेली वेतनवाढ सर्व कामगारांना लागू करावी, अशा विविध मागण्या करण्यात आल्या.

याशिवाय, वाढती महागाई, उत्पादन क्षमता आणि उद्योगाचा प्रचंड नफा लक्षात घेऊन कंत्राटी कामगारांसाठी यापूर्वी झालेल्या पाच वेतन करारांप्रमाणेच नवीन वेतन करार करण्यात यावा, वेतन कपात थांबवावी, रखडलेला बोनस द्यावा, सुरक्षेची पुरेशी साधने उपलब्ध करून द्यावीत आणि कंत्राटी कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवावा, यासाठी कामगार संघटना दीर्घकाळापासून व्यवस्थापनाकडे पाठपुरावा करत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, कंपनी प्रशासनाकडून केवळ आश्वासने दिली जात असल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती.

अखेर संयमाचा अंत झाल्यानंतर संघटनेच्या नेतृत्वाखाली कामगारांनी प्रशासकीय कार्यालयाकडे मोर्चा वळवून मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन सुरू केले. आंदोलकांनी व्यवस्थापनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला. या घेरावामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांना कार्यालयाबाहेर पडणे कठीण झाले, तर कार्यालयीन कामकाज काही काळ पूर्णपणे ठप्प झाले.

वाढता तणाव लक्षात घेऊन कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कामगार संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा सुरू केली. दीर्घकाळ चर्चा झाल्यानंतर व्यवस्थापनाने विविध मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी ८ दिवसांची मुदत मागितल्याची माहिती कामगार संघटनेच्या प्रतिनिधींनी दिली.

कामगार संघटनेने इशारा देताना सांगितले की, ८ दिवसांच्या आत मागण्या पूर्ण न झाल्यास कामगारांच्या संयमाचा बांध फुटल्यास त्याला सर्वस्वी व्यवस्थापन जबाबदार राहील.

या घेराव आंदोलनानंतर व्यवस्थापन बॅकफूटवर आल्याचे चित्र असून, पुढील आठ दिवसांत कंपनी कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.