जिल्ह्यात सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसाच्या

नदीच्या पुरात चारचाकी वाहून गेली; मायलेकी बेपत्ता

Tragic Accident

दारव्हा तालुक्यातील दहेली येथील घटना

यवतमाळ : जिल्ह्यात सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने पुढील तीन दिवस यवतमाळ जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट दिला असून, जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या आदेशानुसार आज, शुक्रवारी शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

अशातच गुरुवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे दारव्हा तालुक्यातील दहेली येथील कुपटी नदीला आलेल्या पुरात आर्णी तालुक्यातील लोणी येथील एका ईर्टिगा चारचाकी वाहनाला पुराच्या पाण्याचा फटका बसून ते वाहून गेल्याची घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

या दुर्घटनेत माधवी अविनाश खंदारे, प्राची अविनाश खंदारे आणि साची अविनाश खंदारे या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. तर वाहनचालक तथा पती अविनाश खंदारे यांना प्रशासनाच्या आपत्ती बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढले.

मिळालेल्या माहितीनुसार, लोणी येथील अविनाश खंदारे हे राळेगाव येथे एका कार्यक्रमासाठी सहकुटुंब गेले होते. तेथून बोरी अरब येथे एका नातेवाईकाला सोडून दारव्हा मार्गे लोणीकडे परतत असताना दहेली येथील नदीला आलेल्या पुरात त्यांचे वाहन अचानक अडकले. त्यानंतर दोन मुली व एक महिला पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी बचाव पथकाने शोधमोहीम सुरू केली.

या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.