वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कळमनुरी पोलिसांची कारवाई
दोन दिवसांत 57 प्रकरणे दाखल; 36 हजार 620 रुपयांचा दंड वसूल
कळमनुरी (Traffic Rules Violation) : शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी आणि नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे यासाठी कळमनुरी पोलीस प्रशासनाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.
दिनांक 11 जून रोजी मोटार वाहन कायद्यानुसार 25 प्रकरणे दाखल करण्यात आली. या कारवाईत संबंधित वाहनचालकांकडून 15 हजार 100 रुपये दंड वसूल करण्यात आला.
तसेच, दिनांक 12 जून रोजी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध 32 प्रकरणे दाखल करण्यात आली असून 21 हजार 520 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
याशिवाय मोटार वाहन कायदा कलम 285 अन्वयेही नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नागरिकांनी वाहन चालविताना हेल्मेट आणि सीटबेल्टचा वापर करावा, वाहनाची आवश्यक कागदपत्रे सोबत बाळगावीत तसेच वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक जमीर नाईक यांनी केले आहे.