भारत-बांगलादेश सीमेवर देशाच्या सुरक्षेसाठी कर्तव्य

भारत-बांगलादेश सीमेवर गडचिरोलीचा सुपुत्र शहीद; BSF जवान सुरेश आंबडर यांना वीरमरण

Suresh Ambadar

पश्चिम बंगालमध्ये घुसखोरीविरोधी कारवाईदरम्यान संशयित घुसखोरांच्या गोळीबारात बलिदान; मरारटोला गावासह गडचिरोली जिल्ह्यावर शोककळा

भारत-बांगलादेश सीमेवर देशाच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावत असताना गडचिरोली जिल्ह्यातील सीमा सुरक्षा दल (BSF) चे जवान सुरेश दुर्गा आंबडर यांनी सर्वोच्च बलिदान दिले. पश्चिम बंगालमधील सीमावर्ती भागात घुसखोरीविरोधी मोहिमेदरम्यान संशयित घुसखोरांशी झालेल्या चकमकीत ते गंभीर जखमी झाले. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेनंतर त्यांचे मूळ गाव मरारटोला (ता. कुरखेडा) तसेच संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

माहितीनुसार, भारत-बांगलादेश सीमेवर घुसखोरी रोखण्यासाठी सीमा सुरक्षा दलाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत होती. या मोहिमेत सहभागी असताना संशयित घुसखोरांनी जवानांवर अचानक गोळीबार केला. या हल्ल्यात सुरेश आंबडर गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. अवघ्या 35 व्या वर्षी देशसेवेत त्यांनी वीरमरण पत्करले.

शहीद सुरेश आंबडर यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी आणि एक लहान मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे आंबडर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावकऱ्यांसह संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

शहीद जवान सुरेश आंबडर यांचे पार्थिव लवकरच त्यांच्या मूळ गावी मरारटोला येथे आणण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.